Thursday, September 14, 2017

शाळेतल्या जोड्या...

शाळेतली क्रश आठवताहेत?... त्याला कुठलंच लॉजिक नव्हतं आणि सारासार विचार तर नाहीच नाही... शाळेत प्रत्येकाला कधीना कधी, कुणाच्या न कुणाच्या नावाने चिडवले असेलच याबाबत मी ठाम आहे... आणि ह्या शाळेतल्या जोड्या जमण्यात, तुमच्या पेक्षा तुमच्या वर्ग मित्रांचा त्यात सिंहाचा वाटा असतो! मुली याबाबतीत कुठल्या अंगाने विचार करत असतील ते नाही मी सांगू शकत, पण मुलांची लॉजिक याबाबतीत भलतीच असायची!... आज मागे वळून पाहताना त्या जोड्या आठवून हसायला येते... किती सहज match making करायची पोरं शाळेत!...

शाळेत हमखास ठरलेली जोडी असायची ती सारख्या आडनावाचा मुलगा आणि मुलगी यांची!... अरे आडनाव सारखे मग भाऊ-बहीण असतील... "चूप रे भावा-भयनीच्या, ....बाप कुठाय सारखा त्यांचा?... लवरच आहेत ते!"... त्यावेळी "भावा-भयनीच्याss" हा शब्द एखाद्या इरसाल शिवी सारखा उच्चारला जायचा! आमचा 'शेलार' याच कॅटॅगरितला... अशा जोड्यांसाठी काही अपवाद होती... ती सारख्या आडनावाची असली की अगदी पूर्वीची ओळख असल्या सारखी न लाजता, न घाबरता संवाद करायची... मग जिच्या किंवा ज्याच्या नावाने चिडवल्यावर तुम्ही चिडत नाहीत ती जोडी कसली!... अशांना मग पोरं रक्षाबंधनाला पिडायची!... म्हणजे आतून कळ छातीत यायची पण नाईलाजाने पट्टी हातावर बांधून घ्यायची!... आडनावासोबतच जर त्यांच्या वडिलांचे नावही सारखे असले की ती अगदी नर्सरी पासूनचीच भावंड आहेत म्हणून समजावे!

मुलांची पुढची जोडी म्हणजे, मुलीच्या बापाचं नाव आणि मुलाचं नाव सारखं असलेली जोडी... म्हणजे मुलाचं नाव 'सोपान पाटील' असेल आणि मुलीचं नाव 'विद्या सोपान शेळके' असले तर, पोरं सोपान लाच विचारत यायची, "विद्याsss, सोपान पाटील कुठे गेली रे? आज दिसली नाही वर्गात!"... तो "विद्या" आणि "सोपान पाटील" मधला pause अगदी मजेशीर असायचा आणि पाठीमागून सगळी पोरं खी खी खिदळायची! 😂😂😂

आम्ही म १ च्या वर्गात असल्यामुळे, अभ्यासवरूनही आमच्या जोड्या ठरत... म्हणजे घटक चाचणीला एक मुलगा वर्गात सातवा आला आणि एक मुलगी आठवी... सहामाही परीक्षेत ही दोघांचा तोच क्रम... मग पोरांनी सात-आठ ची थेट लग्न-गाठच बांधून टाकली. परीक्षेत सारखे गुण मिळवणाऱ्यांच्या तर हमखास जोड्या लागत. आमच्या वर्गात पहिल्या पाचात एकही मुलगी नसायची, एक बिचारी खूप मेहनत करून वर्गात सहावी यायची... पोरांनी त्या पाचही मुलांना पांडव घोषित केले आणि त्या सहाव्या येणाऱ्या मुलीला चक्क 'पांचाली'! ☺

आडनावांच्याही चित्र-विचित्र जोड्या पोरं लावायची, जसे 'जोत्स्ना कदम' आणि 'सुदेश धावडे'... म्हणजे ती दाहीने कदम - बाये कदम आणि हा सुसाट धावत!... आडनावांच्या जोड्यातून शिक्षक ही सुटले नाहीत, जसे खोबरे टीचर आणि खरवंटीकर सर. पोरं "वाळूचे कण रगडता तेल ही गळे" ह्या म्हणीचं विडंबन "खोबऱ्या ची वाटी 'किस'ता करवंटी ही मिळे" असे करायचे.

कधी कधी प्रेमाचा त्रिकोण ही तयार होत असे, मला आठवते शाळेत एका वर्षी गणिताला त्रिकोणाची प्रमेये होती आणि त्या वर्षी मी, माझा मित्र आणि वर्गातली एक मुलगी... आम्ही तिघेच एका शिकवणीला जायचो... पोरांनी आम्हा तिघांचे "को-बा-को" या नावाने बारसे घातले!

या खेरीज इतरही अनेक जोड्या होत्या जशा, सेम नंबरच्या बस ने प्रवास करणाऱ्या जोड्या, एकाच सेक्टर मधे राहणाऱ्या जोड्या, सेम ब्रँडची सायकल घेऊन येणाऱ्या जोड्या, योगायोगाने एकाच दिवशी शाळेत गैरहजर राहणाऱ्या जोड्या, समांतर रेषेत बसून line मारणाऱ्या जोड्या, ढापण जोड्या, कुरळे केस असलेल्या जोड्या, एकाच कलेची आवड असलेल्या जोड्या, वर्गात एखाद्या मुलीचे एखाद्या मुलाशी भांडण झाले तरी पोरं त्यांच्या जोड्या लावत! इतकंच कशाला, लंगडीत एका मुलाला एक मुलगी नेहमी आउट करायची म्हणून पोरांनी संशय घेऊन त्यांची जोडी घोषित करून टाकली!

अशावेळी खरी जोडपी शाळेच्या बाहेर गुपचूप भेटायची. माझ्या सारखी भित्री पोरं, मुलींचा फक्त बस स्टॉप पर्यंत पाठलाग करायची, तिला चोरून बघायची आणि तिची बस गेली की रस्त्यावरचं एखादं डबडं उडवत घरापर्यंत आणायची. हे डबडं घरापर्यंत उडवत नेलं तर ती आपल्यालाच मिळणार अशी स्वतःच स्वतःशी स्वप्नाळू पैज लावायची! 😊

आज इतकी वर्षं झाली शाळा संपून पण त्या जोड्या आणि त्यांच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. लग्नासाठी काही मुलींचे प्रोफाइल्स आले होते, आई सांगत होती "अमकी उंचीला थोडी बुटकी आहे, तमकीची पत्रिकाच नाही जुळत. ही चांगली आहे पण आत्याबाई म्हणत होत्या त्यांच्या आख्या घराण्याला शुगर आहे, पुढे जाऊन मुलीलाही होईल कदाचित"... पण माझे आईकडे लक्षच नव्हते, मला डोळ्यांसमोर दिसत होता कालचा निरागस भूतकाळ आणि आजचा डोळस वास्तव... "लंगडीत मुलांचा अर्धा संघ गारद करणारी परवा तिच्या तीन मुलांसोबत मॉल मधे भेटली, म्हणाली स्वतः साठी वेळच नाही. ज्या मुलीला शाळेत ३-४ मुलांवरून चिडवायचो तिचे अद्यापि लग्नच झालेले नाही. जिचा बस स्टॉप पर्यंत पाठलाग केला ती आज नवऱ्याकडे चारचाकी असूनही खुश नाही"...

आजच्या स्वार्थी मॅट्रिमोनी जोडयांपेक्षा, माझ्या शाळेतल्या निस्वार्थी जोड्या बऱ्या होत्या... निदान आठवल्या की चेहऱ्यावर हसू तरी आणतात...

~ अरुण भऊड

Thursday, July 27, 2017

गतिमान...

सारं गतिमान झालंय हल्ली...
त्यामुळे तोल जातो माझा...
भरधाव वेगानं कुणीतरी समोरून जातं...
आणि मग बाचकायला होतं...

'विसावा' घेणं म्हणजे,
पळण्याच्या शर्यतीत विसावा आल्याचं भासतं...
मग मी देखील पळतो...
अगदी ऊर फुटेस्तोवर, धावत सुटतो...

विक डेज ला गावं शहराकडे पळतात...
आणि विकेन्ड ला शहरं गावांकडे...
मधे आहेत फक्त भरधाव वेगाने धावणारे रस्ते...
आणि त्यासाठी भरावे लागणारे टोल...

पडवीत आडवा होऊन, वाचायला घेतलेलं पुस्तक...
ते तसंच पडून आहे कधीचं...
फडफडताहेत ती केवळ वाचलेली पानं...
न वाचलेलं, चहाच्या कपाखाली तसंच बंदीस्त...

असा, उन्हा तानातून शहरं, गावं हिंडत बसतो...
घामाघूम होतो, तेव्हा वाटतं...
बिनझाडाच्या सावलीतही थांबावं थोडं...
घामाच्या थेंबांतूनही मग गारवा मिळतो...

पडवितलं पुस्तक उचलावं...
भरधाव रस्त्यातून एखादी पाऊलवाट काढत,
शहरं आणि गावांपासून दूर जावं...
विसाव्याचं एक झाड शोधावं...
अन चहाच्या कपाचा शिक्का शोधून,
उरलेलं निवांत वाचत पडावं...

~ अरुण भऊड

Wednesday, July 5, 2017

एक वर्ष onsite चं...

एक वर्ष onsite चं...

हल्ली मी social media वर तितकासा फिरकत नाही...मी काही व्यस्त नाही, पण इथे आल्यावर खूप वेगळं आयुष्य पाहायला मिळालं... व्हाट्सअँप आणि फेसबुक वर पोस्ट टाकण्यातच आपलं आयुष्य चाललंय असं वाटलं...

इथल्या लोकांचा दिनक्रम, त्यांचं कुटुंबासाठी साठी वेळ देणे, शरीरावर मेहनत घेणे, ८ ते ४:३० कामाची वेळ पाळणं आणि कामाच्या वेळी फक्त काम आणि बाकी गोष्टींकडे पाहायचे हि नाही... काळा-गोरा भेद नाही, मुलगा - मुलगी इतक्या सहजतेने बोलतात, अगदी अनोळखी असले तरी... मी किती लाजायचो लहानपणी...

कमी कपडे घालून एखादी मुलगी समोरून येत असली कि तिला पहायची उत्सुकता आपल्याकडे कशी निर्माण होत गेली हळूहळू अगदी शाळेतल्या वयापासूनच...आणि बलात्काराचे प्रकार आपल्याकडेच इतके का हे उमगलं... एखाद्या सुंदर कटिबद्ध विवस्त्र स्त्रीला हि एक सौंदर्य म्हणून पहायची शालीनता मी इथे आल्यावर शिकलो... आपण किती अंतर ठेवतो मुलगा आणि मुलगी म्हणून, का तर ते एकत्र आले कि त्याचा थेट अर्थ आपण शरीराशी लावतो... लग्न आणि मूल होणं हे आपल्या साठी mandatory mile stones आहेत आणि या दोन गोष्टीतच सारं सौख्य सामावलेलं आहे असा आपला समज आहे...

आई आणि बाप हे आता रिटायर्ड झालेत, नातवंडं त्यांच्या माडीवर खेळतायेत, मी आणि ती आम्ही दोघेही कामावतोय आणि त्यांना शेवटची तीर्थयात्रा करून आणले कि ते आनंदाने प्राण सोडायला मोकळे... मारताना ते म्हणतात हि, "चांगला सांभाळ केलास बाळा माझा..."

पण इथे आल्यावर यापालिकड चं आयुष्य कळलं... का त्यांनी एक स्वच्छंदी आयुष्य नव्याने जगू नये?...आम्ही ऑफिस ला गेल्यावर माझ्या मुलीचा सांभाळ करणं आणि onsite ला आल्यावर दर ४ महिन्याला पोस्टाने फराळ पाठवण्यासाठीच का उरलंय त्यांचं आयुष्य?...

म्हातारा बाप म्हणजे तो formal कपडेच घालणार आणि आई या वयात तू swimming क्लास ला कशी जाणार?... हि आपल्या विचारांची पोच...

नुसतंच जन्माला यायचं, शाळेत जायचं, मान मॉडेस्तोवर अभ्यास, मग नोकरी, मग लग्न आणि घर मग पोरं जन्माला घालायची, EMI भरायचा... एका तपानंतर कधीतरी जुन्या मित्रांना भेटायचं... मग शुगर होणार आणि मग बीपी... मग काढलेल्या पोरांवर ओझं व्हायचं आणि एक दिवस अंथरूण पकडून तिथेच शेवटचा प्राण सोडणार... किती scripted आहे हे सगळं...

इथे एक ५५ वर्षाचा तेज असणारा निग्रो तरुण angular developer म्हणून काम करतो काय आणि मग मधेच १ वर्षाचा ब्रेक घेऊन skiing शिकतो काय आणि पुन्हा तोच उत्साह घेऊन polymer developer म्हणून रुजू होतो काय...आणि मागच्याच आठवड्यात रुजू झालेल्या २२ वर्षाच्या fresher मुलीला date वर बोलावतो काय...

आपण मात्र रडतो, अरे तिकडे लोकांना सरकारी भत्ता मिळतो रिटायर्ड झाल्यावर... त्यांना saving चं टेन्शन नाही...

अरे मग तुम्हालाही कोणी सांगितलंय कणा तुटेपर्यंत काम करायला... दोन फ्लॅट आहेत ना तुझे 2BHK? तशीच वेळ आली तर त्यातला एक फुका... पण हात पाय चालताहेत तोवर सुटा!!!...

मुलांसाठी कामावतोय रे सारं, त्यांचं उच्च-शिक्षण, पोरीचं लग्न...

अरे कुणी सांगितलंय?... मुलांचा आधार बनताय कि त्यांच्या कुबड्या?... त्यांना फक्त लायक बनवा आणि त्याच्याघरी म्हातारपणी मी एका कोपऱ्यात पडून राहणार नाही याच्या तुम्ही लायक बना!!!...

अजून बरंच काही सांगून गेलं हे एक वर्ष onsite चं... जसं जमेल तसं सांगत जाईन पुढे...

नवीन technology तर आपण नेहमीच घेतो बाहेरच्यांकडून... थोडं आयुष्यही पहावं म्हटलं जरा खिडकीतनं वाकून...तसं आपल्या सारखं नाही ठेवत इथे झाकून... 😀

~ अरुण भऊड

Tuesday, July 4, 2017

क्षण...

ते क्षण...
इतके हळवे...
इतके नाजूक...
तरी आठवताच...
उठते छातीत एक कळ...

त्या समुद्र किनारी...
संथ प्रवाह...
निरव शांतता...
हातात कोमल हात...
तरी साद घालताच...
मनात उसळतात उंच लाटा...

त्या झाडाखाली...
तुझ्या डोळयांत...
प्रेमळ जिव्हाळा...
अन मायेची साऊली...
तरी मागे पाहताच...
धडकी भरत येते एक वादळ...

या जन्मी...
आजार नाही...
अपघात नाही...
कि नाही कुठलाच फास...
प्राण शोषिल कदाचित...
आठवणीतलाच, क्षण एखादा खास...

~ अरुण भऊड

Monday, June 19, 2017

व्यसन...

बापाला कसं कळेल...
आज पिऊन आलोय...
नाक्यावर थोडं थांबून...
Mintos चघळत आलोय...

अरे पण cigarate ओढलीस ना,
शर्टाला वास येतोय...
मित्राच्या गाडीत air फ्रेशनर आहे,
तोच शर्टवर मारून आलोय...

अरे पोट किती सुटलंय या वयात?
मेस मधलं जेवण खात आलोय...
आणि डोळ्यांखालीहि किती सुजलंय?
रात्री जागून अभ्यास करत आलोय...

हल्ली, रात्री अपरात्री घरी येतोस?...
ग्रुप studies करून आलोय...
आणि फोन केल्यावर उचलत का नाहीस?...
फोन silent वर ठेऊन आलोय...

नको ते शिक्षण घेत चाललोय...
धुरांच्या रेषेत हरवत चाललोय...
तरुणाईच्या नशेत वाहवत चाललोय...
बिअर च्या बाटल्या पित चाललोय...

सारं काही लपवत आलोय...
आई बापाला फसवत चाललोय...
व्यसनाच्या अधीन झालोय...
हळूच जीवन संपवत चाललोय...

~ अरुण भऊड

Sunday, June 11, 2017

जगणं...

तुझं जगणं म्हणजे,
वाट फुटेल तिथं धावत सुटणं...
माझं जगणं म्हणजे,
सतत कशाचीतरी वाट बघणं...

तुझं जगणं म्हणजे,
स्वतःच स्वतःची पाऊल वाट आखणं...
माझं जगणं म्हणजे,
कुणीतरी आखलेल्या रेषेवर स्वतःला रेटणं..

तुझं जगणं म्हणजे,
हवं तेव्हा थांबणं, हवं तेव्हा पळणं...
माझं जगणं म्हणजे,
घड्याळातल्या काट्यांची वेळ पाळणं...

तुझं जगणं म्हणजे,
भारावून जाणं, हरखून जाणं...
माझं जगणं म्हणजे,
जखडून जाणं, गुरफटून जाणं...

तुझं जगणं म्हणजे,
लहानातला लहान क्षण देखील अनुभवणं...
माझं जगणं म्हणजे,
कवडी कवडी चा हिशोब ठेवत तिजोरी भरणं...

तुझं जगणं म्हणजे,
कुठल्याही तालावर थिरकणं...
माझं जगणं म्हणजे,
हमखास कंबर लचकणं...

तुझं जगणं म्हणजे,
मरतानाही चेहऱ्यावर समाधान असणं...
माझं जगणं म्हणजे,
जगण्याला कायमचं एक सुतक लागणं...

तुझं जगणं, ते खरं जगणं...
माझं जगणं, हे तर रोजच मरणं...

~ अरुण भऊड

Wednesday, June 7, 2017

अव्यक्त...

ना माझ्या बोलण्यातून कधी आलं...
ना तुझ्या नजरेतून कधी जाणवलं...

आयुष्यभर तूही उरात ठेवलंस...
आणि मलाही झुरत ठेवलंस...

शब्दात सांगता न येणाऱ्या तुझ्या व्यथांना मी कसं लिहावं...
तुझ्या चेहऱ्यावरील मुक्या भावनांना मी तरी कसं वाचावं...

कदाचित तुला असं काही वाटलंच नसावं...
अन मला मात्र उगीचच तसं वाटलं असावं...

सारी वादळं शमल्यावर, उभं आत्मवृत्त छापलं...
तुला रुचेल न-रुचेल म्हणून तुझं नाव नाही घातलं...

हसावं, रडावं, प्रसंगी समुद्रा काठी उभं राहून किंचाळावं...
शब्दांनी नाही निदान स्पर्शानं का होईना, एकदा तरी व्यक्त व्हावं...

~ अरुण भऊड

Sunday, June 4, 2017

मी... माझा...

एक मित्र माझा, हरवलेला...
आतल्या आतच रमलेला...
कुठलेही बंधन नसलेला...
परी सभोवताल न स्वीकारलेला...

पटतंय स्वतःला रोज वेळ द्यावा थोडा...
एकांतात स्वतःशी बोलावं घडाघडा...
तो त्याही पुढे जाऊन अडकून पडला...
नाईट लॅम्पलाच सूर्य समजून बसला...

आरसा हेच माझे प्रतिबिंब, सेल्फी हेच सर्वस्व...
मीच रुसतो माझ्यावर, स्वतालाच स्वतःचा गर्व...
एका काळोख्या खोलीत कोंडून सरले एक पर्व...
आता प्रखर उन्हात फिरला तरी अंधारलेले सर्व...

विचारल्यावर असतो एक तक्रार नेहमी गात...
धरली ज्यांची आस त्यांनी दिली नाही साथ...
एकाकी मी, आता मलाच सोडून नाही जात...
माझे मलाच आता कापता येत नाहीत हात...

विहिरीच्या तळाशी अडकून पडलाय जीव...
हातपाय चालव थोडे, आधी पोहायला शिक...
तेव्हाच सरतेशेवटी यातून तरून पार होशील...
नाहीतर बुडून मेल्यावरच फुगून वर येशील...

~ अरुण भऊड

Saturday, April 1, 2017

शिसपेन्सिल...

कितीतरी वर्ष,
संताप, असंतोष, मतभेद,

नव्हे तर,
प्रेम, मस्करी आणि आनंद...

एका कोपऱ्यात बसून,
मुकाट जगत होतो...

व्रात्य पोर माझी,
ढुंगणाला पोचूक शिसपेन्सिल टोचून पळाली,
आणि मी किंचाळत सुटलो...

~ अरुण भऊड

Wednesday, March 29, 2017

आराम...

निवांत साठलेल्या पाण्यात शेवाळ जमलंय...
पडलेल्या वस्तूच कालांतराने विघटन घडलंय...
कलंडलेल्या माझ्या सायकल ला धुळीने घेरलंय...
आरामात चाललेल्या आयुष्याने कुणाचं भलं झालंय?

~ अरुण भऊड

Friday, March 24, 2017

अंधेरा...

डर लगता है,
इस उजालेंसे...
में तो वही ठीक हूं,
जहाँ है घनघोर अंधेरा...

कम से कम आस है,
रोशनी के इक किरण कि...
साथ में तो नही घूमतां,
हर पल एक काला साया...

~ अरुण भऊड

Thursday, March 9, 2017

गिरीशसाठी...

तुझ्या असण्यातच एक हुरूप
तुझ्या नसण्याने मैफल कुरूप...
तुझी देहबोली सांगते एक...
पण तुझ्या मनात गोष्टी अनेक...

आयुष्य कसे जगायचे,
हे तुझ्याकडूनच शिकायचे...
शीण कंटाळा अन टेन्शन,
कसे क्षणात झटकून टाकायचे...

इतरांचं अधिकार गाजवणं,
कसं bossing वाटतं...
तुझं तसं वागणं,
मात्र आपलंसं वाटतं...

इतरांचे साखरेत घोळलेले बोल,
जिव्हाळा देत नाहीत...
तुझ्या चार थापडा खाल्या जरी,
त्याचं काहीच वाटत नाही...

सतत एकलव्यासारखं दुरून,
तुझ्याकडून काहीतरी घेत राहिलो...
तुझ्याकडून मिळलेलंच...
तुला नव्याने परत देत राहिलो...

दूर असू वा जवळ,
सतत तुला भेटत राहू...
वाढदिवासाखेरीज
रोजच तुला आठवण राहू...

~ अरुण भऊड...

Tuesday, March 7, 2017

Happy women's day!

When I was born
I got a mother
and a sister
But no woman...

grew up little
I had a teacher
then many more teachers
But no woman...

I went to college
Had a girlfriend
fell in her love
But no woman...

I got married
Became spouse
Got me wife
But no woman...

few years later
We had a baby
A cute little girl
But no woman...

Wish I could see
beyond relations
Many great women
I missed in my life...

~ Arun Bhaud

Sunday, March 5, 2017

स्ट्रगल...

मी माझा 1 बीएचके मधला स्ट्रगल संपवून, त्याच्या हाती रूम च्या किल्ल्या देतो...
मी माझ्या 2 बीएचके च्या प्रगतीपथावर आरूढ होतो आणि त्याचा 1 बीएचके चा स्ट्रगल सुरु होतो...

माझ्यासाठी तो त्याचा स्ट्रगल असतो... माझ्यासाठी कदाचित तो त्याचा स्ट्रगल असतो...
पण त्याच्यासाठी तो 1 रूम किचन चा स्ट्रगल संपवून, 1 बीएचके मध्ये आल्याचा आनंद असतो...

गरजा किती हावऱ्या असतात पहा, पूर्ण होत नाहीत तोवर मी स्वतःला रेटत असतो...
आणि पूर्ण होताच तिचे बारसे घालून, पुढल्या वर्षाला नव्या गरजे पोटी मी पुन्हा गरोदर राहतो...

कालचा समाज हा तोच आजचा समाज असतो, केवळ माझ्या प्रगतीनुसार त्याची व्यथा बदलत असते...
चाळीतला समाज माझ्याकडे, फ्लॅट ची आस लावून असतो तर फ्लॅट संस्कृती माझ्या टॉवर कडे डोळे लावून बसते...

उद्या कदाचित 2 बीएचके जाऊन, 3 बीएचके येईल, आणि परवा तोही जाऊन पेंटा हाऊस येईल...
कितीही मिळवले तरी नेहमी कमीच पडत जाईल आणि मी मरेपर्यंत मला, ओढतच राहीन...

कोण जाणे कधी माझा हा स्ट्रगल संपून जाईल, कुणास ठाऊक कधी एकदाचा ह्या समाजाचा स्तर संपून जाईल...
टॉवर च्या त्या टेरेस वरून मी वर न पाहता जेव्हा खाली वाकून पाहीन, तेव्हाच एकदाचा माझा हा स्ट्रगल संपून जाईल...

समाज माझ्याकडे पुन्हा डोळे वटारून पाहील... पण मी मात्र समाधानाने माझे डोळे मिटून घेईल...
तेव्हाच एकदाचा माझा स्ट्रगल संपून जाईल... माझा स्ट्रगल संपून जाईल...

~ अरुण भऊड

Sunday, February 26, 2017

मला उद्ध्वस्त व्हायचंय...

मला उद्ध्वस्त व्हायचंय...
२७ व्या मजल्यावरून खाली ऊडी टाकून,
किंचाळत,
धाड्कन जमिनीवर आपटायचंय...

काही गोष्टी जन्मतःच लाभल्या,
काही हळूहळू मिळवत गेलो...
आज एक जुगार खेळून,
जे आहे नाही ते सारं गमावायचंय...

शाळेत दरवर्षी पास झालो,
आज नापास होऊन पाहायचंय...
एक दिवस सकाळी जाऊन,
स्वतःच स्वतःला कामावरून काढायचंय...

रहायला फ्लॅट, फिरायला कार,
जगायला पैसा, मेल्यावर इन्शुरन्स...
स्वतःभोवतीचं हे कवच,
एखादं अंड फुटावं इतक्या सहज फोडायचंय...

खिशातलं पाकीट, आतले क्रेडिट कार्ड्स,
सारं सारं नेऊन समुद्रात फेकायचंय...
अनवाणी पावलांनी किनाऱ्यावर,
उद्ध्वस्त होऊन दगडीवर बसायचंय...

नाती, यश, पैसा आणि नशीब,
यांच्या जीवावर उडल्यानंतर...
आता माझ्यात उरलेल्या केवळ मला,
याहून काही निराळं जमतंय का ते पाहायचंय...

~ अरुण भऊड

Tuesday, February 14, 2017

वॅलेंन्टाईन्स डे च्या निमित्ताने...

तू का हल्ली येत नाहीस?
किती दिवस झाले भेटली नाहीस,
समुद्र किनारी खुद्कन हसली नाहीस...
माझ्या बायकोवर रुसली तर नाहीस?

अगं सकाळी असते बायकोची डब्याची घाई,
दुपारी असते तिच्या मुलीची आंघोळीची पाळी...
संध्याकाळी बाजारहाट करण्यातून तिची सुटका नाही,
माझी बायको घरात नसताना भेटण्यावाचून पर्याय नाही..

सुट्टीच्या दिवशी किचनमध्ये तू पाठमोरी दिसतेस,
आंघोळीनंतर खिडकीत मग केस पुसत असतेस...
तुझ्या जवळ येताच बायकोला पाहून लाजतेस,
मुलीचा आवाज ऐकताच मला टाकून पळतेस...

रात्री दमून भागून जेव्हा तू बिछान्यावर पडतेस,
कुशीत बाळ घेऊन एका आईसारखी निजतेस...
शाश्वत अशी तू केवळ स्वप्नांमध्ये भेटतेस,
पौर्णिमेच्या रात्री दूर चांदण्यात दिसतेस...

लग्नानंतरही भेटता यावं अशी सोय कुणीतरी,
आधीच केलेली दिसते...
Valentine's च्या निमित्ताने आजतरी,
सांग किती वाजता भेटते?... 💕

~ अरुण भऊड

Sunday, February 5, 2017

तुझा वाढदिवस...

तूला दिलेल्या पहिल्या गुलाबाचं पान,
कुठल्याश्या एका जाडसर पुस्तकात,
बंद कपाटात रद्दीच्या ढिगाऱ्यात,
गुदमरून पडले आहे...

तूला दरवर्षी पाठवलेली ती ग्रीटिंग्स,
दुमडली जाऊ नयेत म्हणून,
कित्येक वर्षे बिछान्याखाली...
निपचित पडून आहेत...

अशी कितीतरी पाने,
घरभर पसरली आहेत,
कोरड्या विहिरीतला...
पालापाचोळा होऊन...

सोसाट्याच्या वाऱ्यासवे,
ती सुकली पाने आज,
किंचाळून देत सुटलीयेत...
'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'...

एका वाचकाकडून,
दुसऱ्या वाचकाला,
वाढदिवसाची भेट म्हणून...
हे रुपेरी पान...

ह्या रुपेरी पानाचे नाव काय?
काय तर म्हणे, किंडल पेपर व्हाईट...
आता नाही होणार घरभर पसारा,
त्या सुकलेल्या रद्दीच्या पानांचा...

~ अरुण भऊड

Sunday, January 29, 2017

अपुरा...

वाटलं आवडेल तिला म्हणून झरझर टाकलं लिहून, म्हटलं वाचताच जाईल भारावून...
तुझ्याकडून तरी हे असलं अपेक्षित नव्हतं असं म्हणून, स्वयंपाकघरात गेली ती निघून...
किती अपुरा पडतो मी, नुसत्या कल्पनेतील एक क्षणभर कवी बनून...
कसे होणार माझे, प्रत्यक्षात एक आयुष्यभराचा जोडीदार म्हणून...

~अरुण भऊड

आपले...

कधी कधी...
आपले सख्खे...
आपले रक्ताचे...
आपल्या शेजारचे...
आपल्या लहानपणीचे...
आपले अगदी जवळचे...
आपल्या खास ओळखीचे...
आपली मुले...आपल्या सूना...
आपले नातेवाईक, आपले सोयरिक...
आपली नातवंडे..., आपले सुखी कुटुंब...
या आपलेपणात नकळत एक घुसमट असते...

मैत्रीत ती तशी कधीच नसते...

ओळखी, नाती आणि पाहुणचार जपण्यापेक्षा...
प्रत्येकाशी एक स्वच्छ, नितळ मैत्री जपूया का?...

~ अरुण भऊड

Thursday, January 19, 2017

देव-दर्शन

तो आणि मी,आम्ही दोघेही मंदिरात जातो...
तो आधी जातो, परिसर स्वच्छ करतो, मग मी जातो...

मंदिराच्या चपलेच्या स्टँड जवळ, तो बायकोला ड्युटी लावून जातो...
मग मी येतो, तिच्या पोत्यात साऱ्या फॅमिलीच्या चपला ठेऊन जातो...

मी धक्का-बुक्की करून दर्शनाच्या रांगेत पुढे सरकू पाहतो...
मग तो येतो, दोरखंडाने एक नागमोडी रांग बनवून शिस्त लावून जातो...

खेचखेची करत, एका हाती मी देवसदृश्य सौंदर्याला हार-नारळाने खो देऊन जातो...
रेटा-रेटीच्या शर्यतीत, देवाच्या पायाजवळ डोके टेकता-टेकता राहून जातो...

बाहेर येऊन पाहिले, त्याचा बाप सुकलेल्या हारांची ऱ्हास पोत्यात भरत होता...
तुळशी वृंदावनाशी त्याची माय, माझ्या अगरबत्यांची राख गोळा करत होती...

मंदिराच्या आवारात, माझी मुलगी झुडपांची पाने तोडत खेळत सुटली...
दुसऱ्या कोपऱ्यात त्याचं पोरगं, मातीचा चिखल करून नवी झुडुपे लावत सुटलं...

घरी जाऊन मी, सेलफ्या अपलोड करून फेसबुक, इंस्टाग्राम वर टाकत राहतो...
तो, अजूनही मंदिराच्या चोंदलेल्या नाल्याची सफाई करत बसलेला असतो...

भाविक शांत झाले कि तो, मंदिराचा परिसर धुवून स्वच्छ करून सारे पूर्ववत करून जातो...
देवादर्शनाचा अट्टाहास करून, भंडारा लावून मी आधी निघून जातो, नंतर तो जातो...

मी खाऊन, टाकून उरलेला प्रसाद तो कुटुंबासाठी जेवण म्हणून घेऊन जातो...
मी प्रसाद म्हणून आणलेला शिरा, आठ दिवस तसाच फ्रीझ मध्ये पडून राहतो...

इतके नवस केले तरी, देव नेहमी partiality करत असतो...
मला सोडून, प्रत्येक वेळी तो त्याच्याच पदरात पोरगा टाकतो...

~ अरुण भऊड