Sunday, February 26, 2017

मला उद्ध्वस्त व्हायचंय...

मला उद्ध्वस्त व्हायचंय...
२७ व्या मजल्यावरून खाली ऊडी टाकून,
किंचाळत,
धाड्कन जमिनीवर आपटायचंय...

काही गोष्टी जन्मतःच लाभल्या,
काही हळूहळू मिळवत गेलो...
आज एक जुगार खेळून,
जे आहे नाही ते सारं गमावायचंय...

शाळेत दरवर्षी पास झालो,
आज नापास होऊन पाहायचंय...
एक दिवस सकाळी जाऊन,
स्वतःच स्वतःला कामावरून काढायचंय...

रहायला फ्लॅट, फिरायला कार,
जगायला पैसा, मेल्यावर इन्शुरन्स...
स्वतःभोवतीचं हे कवच,
एखादं अंड फुटावं इतक्या सहज फोडायचंय...

खिशातलं पाकीट, आतले क्रेडिट कार्ड्स,
सारं सारं नेऊन समुद्रात फेकायचंय...
अनवाणी पावलांनी किनाऱ्यावर,
उद्ध्वस्त होऊन दगडीवर बसायचंय...

नाती, यश, पैसा आणि नशीब,
यांच्या जीवावर उडल्यानंतर...
आता माझ्यात उरलेल्या केवळ मला,
याहून काही निराळं जमतंय का ते पाहायचंय...

~ अरुण भऊड

Tuesday, February 14, 2017

वॅलेंन्टाईन्स डे च्या निमित्ताने...

तू का हल्ली येत नाहीस?
किती दिवस झाले भेटली नाहीस,
समुद्र किनारी खुद्कन हसली नाहीस...
माझ्या बायकोवर रुसली तर नाहीस?

अगं सकाळी असते बायकोची डब्याची घाई,
दुपारी असते तिच्या मुलीची आंघोळीची पाळी...
संध्याकाळी बाजारहाट करण्यातून तिची सुटका नाही,
माझी बायको घरात नसताना भेटण्यावाचून पर्याय नाही..

सुट्टीच्या दिवशी किचनमध्ये तू पाठमोरी दिसतेस,
आंघोळीनंतर खिडकीत मग केस पुसत असतेस...
तुझ्या जवळ येताच बायकोला पाहून लाजतेस,
मुलीचा आवाज ऐकताच मला टाकून पळतेस...

रात्री दमून भागून जेव्हा तू बिछान्यावर पडतेस,
कुशीत बाळ घेऊन एका आईसारखी निजतेस...
शाश्वत अशी तू केवळ स्वप्नांमध्ये भेटतेस,
पौर्णिमेच्या रात्री दूर चांदण्यात दिसतेस...

लग्नानंतरही भेटता यावं अशी सोय कुणीतरी,
आधीच केलेली दिसते...
Valentine's च्या निमित्ताने आजतरी,
सांग किती वाजता भेटते?... 💕

~ अरुण भऊड

Sunday, February 5, 2017

तुझा वाढदिवस...

तूला दिलेल्या पहिल्या गुलाबाचं पान,
कुठल्याश्या एका जाडसर पुस्तकात,
बंद कपाटात रद्दीच्या ढिगाऱ्यात,
गुदमरून पडले आहे...

तूला दरवर्षी पाठवलेली ती ग्रीटिंग्स,
दुमडली जाऊ नयेत म्हणून,
कित्येक वर्षे बिछान्याखाली...
निपचित पडून आहेत...

अशी कितीतरी पाने,
घरभर पसरली आहेत,
कोरड्या विहिरीतला...
पालापाचोळा होऊन...

सोसाट्याच्या वाऱ्यासवे,
ती सुकली पाने आज,
किंचाळून देत सुटलीयेत...
'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'...

एका वाचकाकडून,
दुसऱ्या वाचकाला,
वाढदिवसाची भेट म्हणून...
हे रुपेरी पान...

ह्या रुपेरी पानाचे नाव काय?
काय तर म्हणे, किंडल पेपर व्हाईट...
आता नाही होणार घरभर पसारा,
त्या सुकलेल्या रद्दीच्या पानांचा...

~ अरुण भऊड