Thursday, February 19, 2015

मनातला मी …


मनातला मी … 'Diary' च्या प्रत्येक पाना-पानांतला मी …
नव्या पुस्तकाच्या आतील कोऱ्या करकरीत वासातला मी…
 

मृद्-गंध दरवळत येणाऱ्या पहिल्या पावसाच्या थेंबातला मी …
मातीत झिरपून मायेच्या कुशीत पाझरणाऱ्या झऱ्यातला मी …

अंधार दूर करण्या जळणाऱ्या मेणबत्तीच्या मेणातला मी …
अंगण सारवण्या गेरु मिसळलेल्या गाईच्या शेणातला मी …

नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाच्या पहिल्या श्वासातला मी …
हवेत अलगद उडवलेल्या बाळाच्या निरागस हास्यातला मी …

चॉकलेटसाठी चिमुकल्या हातावर टेकवलेल्या नाण्यातला मी …
प्रसिद्धीची आस नसलेल्या त्याच्या बोबड्या गाण्यातला मी …

मिसरूडहि न फुटलेल्या प्रेमातील कोवळ्या वयातला मी …
खिडकीतून पहात खुद्कन हसणाऱ्या तिच्या लाजेतला मी …

पहिले चुंबन घेण्या जवळ ओढलेल्या तिच्या थरथरत्या ओठातला मी …
गर्दीत धरलेला हाथ सोडवण्या धडपडणाऱ्या तिच्या बोटांतला मी …

चुलीवर शिजवलेल्या आईच्या हातच्या रुचकर जेवणातला मी …
बायकोने प्रेमाने केलेल्या चहातून दरवळणाऱ्या वाफेतला मी …

 कधीही न बदललेल्या बाबांच्या मनगटावरल्या घड्याळातला मी …
आजीच्या बटव्यातला मी … आजोबांच्या धुरकट चष्म्यातला मी …

टेकडीवर अनवाणी भटकणाऱ्या धनगराच्या कळपातला मी …
तुमच्या आमच्या सारखे आयुष्याचे ओझे वाहणाऱ्यातला मी …

चालून चालून पार जीर्ण झालेल्या चामड्याच्या चपलितला मी …
हरिनामात मंत्रमुग्ध झालेल्या वारकऱ्याच्या चिपळीतला मी …

आयुष्यभर पळून थकलेल्या हृदयाच्या चुकलेल्या ठोक्यातला मी …
समाधानाच्या तिरडीवर विसावलेल्या शेवटच्या बिछान्यातला मी …

~ अरुण भऊड

 

Tuesday, February 17, 2015

कवितेची हुक्की


Office मधून घरी जाता जाता, रस्त्यातच कवितेची हुक्की आली
वाटलं 'बस'नेच आलो असतो आज, उगीचच 'स्कूटर' सोबत आणली


कवितेतली हिरवळ दिसून, तोडत सारे signal वेगात धूम ठोकली
कल्पनेतल्या डोहात डुंबताना, स्कूटर सगळ्याच खड्यात घातली
किती आले speed breaker पण मनावर उरला नव्हता ताबा
मनातल्या फुलपाखराने टाकले होते 'ट्रक'लाही मागे आता

कविता जेव्हा माझ्या साऱ्या नसा-नसात भिनली,
कळलेच नाही कधी पुढची 'जाडी' बाई डावीकडे वळली
चमचमत्या 'Left Indicator'ला तिच्या मी रात्रीचे काजवे समजून बसलो
तारे दिसले मिणमिणते जेव्हा बाईंनच्या 'scooty'ला जाऊन ठोकलो

तोल जाऊन रस्त्यात बाई, भरल्या गोणी सारखी पडली
माझी कविताही तिथेच मग फतकल मारून बसली
खरचटले का म्हणून तिला मी formality पाळत विचारले
गाढ कवितेतून जागे झालेले मन होते त्याहूनही दुखावलेले

मी म्हणालो, 'अहो पैसे घ्या हवे तर' पण घरी जाऊ द्या मला
तर गोळा करत गर्दी ती म्हणाली आधी पोलिसाला बोलवा
पोलिसाचे ऐकताच नाव, माझी तर बोबडीच वळली
कवितेतली  कडवी  कल्पनेतच गजाआड दिसली

लाख विनवण्या केल्यावर बाई एकदाची कशी-बशी पटली
'पैसे देतो वर औषधपाणीही करतो' म्हणता चट्कन उठली
दवाखान्यातली गर्दी पाहून बाई  जरा हिरमुसली पण कविता मात्र हसली
कारण उरली सुरली कडवी मला त्या 'waiting room' मध्येच सुचली

मनापासून माफी मागत बाईना 'scooty'सकट घरपोच सोडली
कवितेची हुक्की मला आज चांगलीच महागात पडली


~ अरुण भऊड

Sunday, February 15, 2015

सीमेवरल्या लढाया …


सीमेवरल्या लढाया क्रिकेट सारख्या असत्या जर …
नसती कुठलीच बॉर्डर, असत्या केवळ बाऊन्डऱ्या तर …

बंदूक नाही, कि नाहीत तोफा, इथे सांडत नाही रक्त…
रक्त नुसतेच खवळते यांचे, सारे आहेत क्रिकेट भक्त…

मुडद्यांची रास नाही, कि नाहीत कुणाचे चित्कार …
करतात जल्लोष सारे जेव्हा पडतात चौकार षटकार …

कुणीही हारो वा जिंको, कुणी होतो आनंदी कुणी बसतात करीत दुःख…
छिन्न-विच्छिन्न, भयाण अथवा विदिर्ण इतकं वाईट काही ते नसतं…

कुणीतरी मग उडवतोच फटाके, त्या उडल्या फटक्यांना सीमा नाहीत…
सीमेपलीकडील चिमुरडीही मग हरवतातच  कि त्याच रोषणाईत…

सीमेवरल्या लढाया क्रिकेट सारख्या असत्या जर …
नसती कुठलीच बॉर्डर, असत्या केवळ बाऊन्डऱ्या तर …

~ अरुण भऊड

Wednesday, February 11, 2015

सप्तपदी



नववधू प्रिया मी बावरते, पाऊल नखाशी घुटमळते ।
मग हाती पाहूनी हात तुझा, सप्तपदी मी प्रारंभते ।।

आयुष्यातील वळण नवे, ह्या वळणावरती अडखळते ।
घेत तुझा 'आधार' नवा, मी पहिले पाऊल सावरते ।।

हे पर्व नवे, प्रवास नवा हा, कुणी प्रवाशी मी शोधिते ।
द्रुढ 'मैत्री'चा घेत हाथ तुझा, मी दुसरे पाऊल टाकिते ।।

नसता मी कधी, कुणी होईल कासाविस का ते मी आठवते ।
'करशील तू काळजी माझी' घेत वचन मी तिसरे पाऊल ठेविते ।।

रात्री उशिरा येताना घरी, कधी चुकेल बस अन भर पावसात मी सापडते ।
नसेल battery, पण असेल ना 'विश्वास'? विचारित तुला मी चौथे पाऊल उचलते ।।

कितीही केले कष्ट, वेचले जीवन, तरी हे जग कस्पटासमान वागवते ।
थोडीशी 'कदर' अन थोडा 'आदर' मागते तुला मी पाचवे पाऊल उमटते ।।

माझ्याही हातून कधी घडतील चुका, त्यांची देत कबुली मी वरमते ।
तुही मोठया मनाने मग करशील ना 'क्षमा' सहावे पद हे  डळमळते ।।

पिंजऱ्यातील पक्षाला जरी मिळाले दाणे, जीवन त्याचे किती कोंदट ते ।
टाकते पाऊल 'स्वातंत्र्याचे' घेत भरारी तुझ्यासवे, हि सप्तपदी मी संपवते ।।

प्रेम-प्रेम म्हणजे काय असते, ते नाही दिलेस तरी चालेल, तू दिलेली हि सप्तपदीच मनी  मी साठवते ।
'प्रेम' म्हणजे तरी 'आधार, मैत्री, काळजी, विश्वास, आदर, क्षमा नि स्वातंत्र्य' याहुन वेगळे ते काय असते ।।

~ अरुण भऊड

Saturday, February 7, 2015

अक्षराय


स्वप्नात एकदा एक कवी आला, 
ओंजळीत होती त्याच्या काही पोरकी अक्षरे 
देवच गेला त्यांना टाकून कवीच्या पदरात, 
जाताना म्हणाला "नीट काळजी घे बरे."

कवीच तो, मग काय विचारता,
सगळ्या अक्षरांशी त्याने केली ओळख-पाळख… 
टोचली लस लेखणीची, लावले वळण,
अन मिळवून दिली त्यांना एक नवीन ओळख. 

प्रत्येक अक्षर निराळे, त्यांची निराळीच ढब,
प्रत्येकाचे निराळेच वळण, तरी कागद हेच त्यांचे वलय … 
वळण जरी नसले एक तरी शिकवण मात्र होती एक,
कवी सोबत वाढताना, अक्षरांना उमगली  होती एक लय. 

हळूहळू मोठे होताना, त्यांना फुटू  लागले "शब्द",
कवीच्या परीसस्पर्शाने त्यांना प्राप्त झाले "अर्थ". 
त्याने केली गुंफण अक्षरांची, ठेवला त्यांवर अंकुश,
अनर्थांच्या शब्दांना कधी फुटलेच नाहीत  अंकुर.

कवीची इतक्या वर्षांची मेहनत,
अक्षरांवरचे त्याचे निर्मळ प्रेम, त्याने केलेले संस्कार… 
यातूनच पैलू पडल्या पाचूसामान,
आकार घेत होते कवीच्या मनातले सुंदर "विचार"!

अक्षरांचे बनले 'शब्द', 
शब्दांपासून बनल्या 'ओळी',
ओळींपासून बनली 'कडवी', अन एक-एक कडवं मिळून … 
जन्मली एक सुंदर "कविता".

कविताही इतकी सुंदर,
इतकी कोमल आणि निरागस,
कि देवालाही आवरला नाही मोह, तिला  उचलून कडेवर घेण्याचा …
कधी कधी एक कविताही पुरते, प्रसन्न करण्या देवाला.

कवीला आशीर्वाद देत, देव म्हणाला ,
"तू होतास कवी, 
म्हणून पदरी पडली एक ओवी ,
तू असता गुंड वा  मद्यपी,
नशिबी आली असती एक शिवी ."

देवाचे आभार मानून कवी वदला,
"अक्षरे तीच मात्र विचार भिन्न-भिन्न,
जरा तोल ढळता, होतो अर्थाचा अनर्थ.
अक्षरांचे शब्दही बनतात, अन बनतात अपशब्द ,
कधी ती घडा-घडा बोलतात तर कधी होतात निःशब्द. 

अक्षरे प्रेमाने उजळवतात, जीवनात असंख्य वाती,
तीच कधी मत्सर बनून येतात, अन तुटतात नाती . 
विचारांचे सुंदर ओहोळ, कधी वाहतात होऊन सांडपाणी ,
कधी देतात हर्षवायू , तर कधी आणतात डोळ्यांत पांणी . 

अक्षरे तीच मात्र आचरण निराळे, शिक्षण निराळे,
परिश्रम निराळे, वृत्ती निराळी आणि त्यांचे स्थानही निराळे. 
ओंजळीत घेत अक्षरे दोन, हात जोडून कुणी म्हणतो 'राम ',
तीच अक्षरे पिस्तुलात ठासून, छातीवर रोखत कुणी म्हणतो 'मरा'. 

अक्षरांना नाही कोणताच धर्म, ती पाळत नाहीत कोणतीच 'जात',
त्यांना नाही कोणत्या सीमा म्हणून शस्त्र घेऊन लढायलाच नाही जात . 
हेवे दावे नाही कि कुठलाच अहंकार नाही , केलीच नाही कधी हिंसा,
पेरावी तशी उगवतात म्हणूनच जगायला लागत नाही कधी पैसा . 

अक्षरे असली जरी कवडीमोल ,
त्यांचे अर्थ आहेत कितीतरी अनमोल,
आपल्यासाठी पृथ्वी असेल नुसतीच गोल ,
पण अक्षरांना भासते ती कितीतरी खोल. 

अक्षरांना जेव्हा दिले प्रेम तेव्हा ती प्रेम करायला शिकली 
एकीचे बळ मिळाले तेव्हा ती नाती जपायला शिकली ,
नंतर त्यांची ती आपसूकच जुळत गेली,
आणि मला एक सुंदर कविता सुचली !"

इतक्यात मला आली जाग, आले भान सभोवतालचे,
स्वप्नातच दीक्षा मिळाली आणि जाणीव झाली… 
देवाने माझ्याही पदरात टाकले आहे दान "अक्षरा" चे
चाहूल लागली मला पण, मी एक बाप झाल्याची … 

'कवीने दिली माया अक्षरांना एका बापाची ,
आता एक बाप देईल माया 'अक्षरा' ला एका कवीची!'

                                                                   ~ अरुण भऊड