घसरण्या आधीच कळलं असतं,
की पुढे निसरडं झालंय...
तर किती बरं झालं असतं...
खड्यात पडण्या आधीच समजलं असतं,
की पुढे खणून ठेवलंय...
तर किती बरं झालं असतं...
भांडण होण्या आधीच जर कळलं असतं,
की तुला राग येतोय...
तर किती बरं झालं असतं...
तुला रडू कोसळण्या आधीच उमजलं असतं,
की तू दुखवलियेस...
तर किती बरं झालं असतं...
आजार होण्याआधीच कळलं असतं,
की जंतू शरीरात शिरलेत...
तर किती बरं झालं असतं...
अपघात होण्या आधीच जर कळलं असतं,
की पुढे जिवाला धोका आहे...
तर किती बरं झालं असतं...
पण या जर तर पैकी,
काही एक आधी कळायचं नव्हतं...
नुसतीच एक शोभिवंत मूर्ती होऊन,
मला आयुष्यभर खितपत पडायचं नव्हतं...
कारण, त्या वेदना, अवहेलना,
तो मत्सर, ती कळकळ, ती तळमळ
जीवाची घालमेल, ते दुःख, ते आनंदाश्रु...
तो रुसवा, अन् फुगवा, ती माफी, अन् समजूत...
तो अल्लडपणा, तो पोक्तपणा, तो राकट चेहरा...
ती शिकवण, ती शिवण ती दुर्दशा, पुन्हा उसवण...
ते यश, ते अपयश, ते पाप-पुण्य, ते समाधान...
ते प्रयत्न, तो आटापिटा, मोहमाया अन् कोमल काया..
ती झुंज, तो लढा, ती हतबलता आणि अंतिम मोक्ष,
हे सगळं मी कोठून आणलं असतं?...