Friday, May 20, 2016

पहाट...

पांढरे ढग दबा धरून असतात घेऊन हातात निळ्या रंगांची पुडी...
सूर्य दिसताच उधळत अख्खी पुडी सारे घेतात त्यावर उडी...
सूर्यहि मग साऱ्या ढगांना घालतो केशरी पिवळ्या रंगांनी आंघोळी...
आकाशात रोज नवी उमटते एक बिन ठिपक्यांची रांगोळी
~ अरुण भऊड

Thursday, May 19, 2016

उशिरानेच उठलो...

रात्री गप्पा रंगत गेल्या सकाळी उशिरानेच उठलो...
लवकर आंघोळ करून ऑफिसला जाऊ म्हणत हातात ब्रश घेतला...
कळलेच नाही माझी नजर चुकवून रूममेट कधी आत शिरला...
वेळेत ऑफिसात जाण्याची आशाच सोडून बसलो... ब्रश हातात तसाच अन कवितेला भेटलो...

लग्नाच्या प्रेमात...

प्रेम म्हणजे हातावर गोंदणं...
लग्न म्हणजे उगीचचं कोंदण

प्रेमाचे ते... संबंध
लग्नाचे ते... निर्बंध

प्रेमात सारं काही अर्पण...
लग्नात केवढे दडपण

प्रेम करते मी लपून छपून...
सगळ्यांना का दाखवते लग्न करुन?

प्रेमात कसले स्वातंत्र्य...
लग्नानंतर कूठून येते पारतंत्र्य?

प्रेम कसे करावे याचे कसलेच नसते सूत्र... नाही कुठलेच शास्त्र...
लग्नानंतरच का सोबत असायला गळ्यात हवे मंगळसूत्र?

प्रेम करताना कुठे पैशावाचून अडते...
लग्नानंतरच का सततची नड भासते?

प्रेमात डेझर्ट म्हणून साधी चालते एक पेपरमेन्ट...
लग्नानंतर का तिला म्हणते मी एक अड्जस्टमेंट?

प्रेमात कसे तू मनाला वाट्टेल ते कर...
लग्नानंतर मी मुलांचं बघते तू जॉबच कर...

प्रेमात किती सहज करते मी सारे अडथळे पार...
लग्नात साधी ठेच लागली तरी तिला का म्हणते संसार?

जगाला दाखवण्यापूरतं हवं तर माझ्याशी तू लग्न कर...
आपल्या आपल्यात  सततचं तू माझ्यावर प्रेमच कर...

~ अरुण भऊड

Tuesday, May 17, 2016

पेय...

पाणी नाही water म्हणतात, त्यात 'R' silent उच्चारतात
नुसतंच मिनरल वॉटर नाही आणखीण बरंच काही पितात

कुणी fresh lime soda, कुणी mocktail घेतात...
Combo meal सोबत cold drink compulsary देतात

Crush, syrup अन fruit punch काय काय विकतात...
गावाकडेही पाहुणे आल्यावर लोक आता थंडा मागवतात

कुणाला वाटते हे सारे व्यर्थ तेही स्वस्थ नाहीत बसत...
संध्याकाळ झाली कि english टाकून पडतात लोळत

उन्हातून थकून भागून आल्यावर माठातलं पाणी कितीजण मागतात...
गावाकडे गेलो कि खालच्या विहिरीचं पाणी प्यायला कोण कोण धावतात

दगडावरून खळाळतं नदीचं पाणी त्यावर पडलेली कोवळी उन्हं...
तोंड लाऊन काठाला हल्ली कितीजण चाखतात...
यांना जरा चाटवा कुणीतरी कोकमाची आगळ आणि कैरीचं पन्हं...
शहाळ्याचे पाणी देखील हे स्ट्रॉ मधून ओढतात

घरच्या म्हशींचे दूध, गाईच्या घट्ट दुधाचा खरवस...
वरण भातावरचं साजूक तूप अन पडीच्या आंब्यांचा आमरस...
हळूहळू सगळ्याचाच आता पडत चाललाय विसर

शितपेयासाठी वापरून नदीचंच पाणी चांगलंच पांग फेडतात
त्याच फॅक्टरीतलं सांडपाणी हळूच पुन्हा नदीतच सोडतात

व्यापारिकरणाच्या या बाजारात सारं सारं दुरावत चाललंय...
उरलं आयुष्य सलाईनची बाटली अन इन्सुलिन साठीच राखून ठेवलंय

~ अरुण भऊड

Saturday, May 14, 2016

एकटाच बसलोय…


काळ्या-मिट्ट अंधारात, मिणमिणती बत्ती
तरीही Beer बार मध्ये, होती तुडुंब भरली गर्दी… 

लपत-छपत जात, कोपऱ्यातली जागा शोधायची होती
भीतभीतच शिरलो आत, मला थोडीशीच घ्यायची होती… 

आधी नुसतीच तंदूरी मागवून, खात्री करून घेतली
आपल्या ओळखीची कुणी व्यक्ती, आसपास नव्हती… 

उगीचच MENU चाळत मी, काही मिनिटे घालवली
वेटरला हळूच इशारा करत, मी पण एक बियर मागवली… 

कित्येक झिंगलेल्या टेबलावर, एक हशा पिकला होता
कुठल्यातरी कोपऱ्यात कुणी, एकटाच टिकला होता… 

कुणी घालत होते हुज्जत, एकाने तर आदळलीच बाटली
दारूड्यांच्या गराड्यात एकट्याने, माझी थोडी तरी फाटलीच… 

झींगाट टेबलावरल्या भांडणात, माझी खुर्ची जराशी सरकली
इतक्यात माझ्या पुढ्यात बियर, ग्लासामध्ये फ़सफ़सली… 

डोळे मिटून शांतपणे, जेव्हा घोट पहिला गळी उतरवला
दिवस भराचा शीण सारा, पार एका झटक्यात उतरला…

घोटामागून घेतले घोट, सोबतीला होती शेंगदाण्याची वाटी
साऱ्या बारची जनता भासे, जणू राबतेय माझ्याच साठी… 

भीती पुरती चेपली होती, अख्खी बियर केली मी फस्त
'वेटर, एक बोतल और लाओ' मला वाटतंय आता मस्त… 

विमान उडाले पुरते हवेत, कानांना आता बसले दडे
देवा शपथ सांगतो यावेळेस, फोन नको लाऊस गडे…

खुर्ची वरून उठत तिनदा, सारा बार भटकून आलो 
हमरीतुमरी च्या टेबलावर, चक्क settlement करून आलो… 

आख्खा खंबा रीझवला की काय लागते भांडण मिटवायला  
क्लासिक माईल्ड दिली कि senti होत, लागतो समोरचाच रडायला… 

शेवटी वेटर बिल तरी आणतो, नाहीतर सगळ्या लाईटि घालवतो 
नाईलाजने मग बियर बारचा मी, जड पावलांनी निरोप घेतो… 

डोळे  ताणत, तोल सावरीत मी शोधत फिरतो मग माझी वस्ती 
रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांची, आता कसलीच उरली नसते धास्ती… 

बेल वाजवून दारावरची, मी तडक आत शिरतो 
खूप दमलोय म्हणत बिछान्यावर जाऊन पडतो… 

दारूच्या नशेत का होईना, मी माझ्या भावविश्वात रमतो
रोजचाच प्रश्ण माझ्यासाठी आज रात्रीपुरता तरी  संपतो…

                                                                                        ~ अरुण भऊड 

Wednesday, May 11, 2016

वेळ...

 
जेव्हा काही कळायची वेळ येते,
तेव्हा नेमकी वळायची वेळ होते… 
 
 
जेव्हा काही कळायची वेळ येते,
तेव्हा नेमकी वळायची वेळ होते,
आता इथे घटकाभर विसावू म्हटलं,
तर पळायची वेळ होते … 
 
माती सारून बाजूला,
जेव्हा अंकुर फुटायची वेळ येते…
धरणीकंप होऊन,
खोल गर्तेत बुडायची वेळ होते… 
 
करकच्चून बसलेल्या गाठी,
जेव्हा सुटायची वेळ येते…
पीळ बसून मग, 
दोरखंडच तुटायची वेळ होते… 
 
कैक पावसाळे सोसून जेव्हा
मोहोरण्याची वेळ येते…
खोड सुकून,
सरपण होऊन जळायची वेळ होते…
 
उठायची वेळ झाली, बसायची वेळ झाली… 
कसायची वेळ आली आता निजायची वेळ झाली … 
मनगटावरले घडयाळ दरीत फेकून,
बेधुंद जगायला, खरेतर सवडच मिळत नाही…
 
हसण्याची वेळ… रुसण्याची वेळ… प्रेमात पडण्याची वेळ,
नाती तिळ-तिळ तुटण्याचीही असते एक वेळ… 
तास, मिनिटे अन सेकंदाच्या मागे धावून,
कितीतरी दवडत चाललाय वेळ… 
 
शिकण्याची वेळ… मोठा होण्याची वेळ … लग्नाची हि झालीय वेळ… 
२ वर्ष झालीकी लग्नाला…  आता पोर व्हायची आलीय वेळ… 
वेळात वेळ काढून रात्री-अपरात्री  पाळत आलोय मी वेळ,
दिवसभराच्या धकाधकीतून अजिबात मिळतच नाही ओ वेळ…
 
दिनक्रमाच्या वेळापत्रकातून जेव्हा मिळेल कधीतरी फावला वेळ,
कळेल खरेतर जीवन जगण्या नसतेच कुठली ठरावीक वेळ… 
जाणीवेने या सैराट होवून जेव्हा मी नुसताच  धावत सुटतो, कितीतरी वेळ,
लोक येतात आडवे म्हणतात, 'एक पोरीचा बाप झालास' आता पुरे झाला पोरखेळ… 
 
                                                                                                        ~ अरुण भऊड