जेव्हा काही कळायची वेळ येते,
तेव्हा नेमकी वळायची वेळ होते…
जेव्हा काही कळायची वेळ येते,
तेव्हा नेमकी वळायची वेळ होते,
आता इथे घटकाभर विसावू म्हटलं,
तर पळायची वेळ होते …
माती सारून बाजूला,
जेव्हा अंकुर फुटायची वेळ येते…
धरणीकंप होऊन,
खोल गर्तेत बुडायची वेळ होते…
करकच्चून बसलेल्या गाठी,
जेव्हा सुटायची वेळ येते…
पीळ बसून मग,
दोरखंडच तुटायची वेळ होते…
कैक पावसाळे सोसून जेव्हा
मोहोरण्याची वेळ येते…
खोड सुकून,
सरपण होऊन जळायची वेळ होते…
उठायची वेळ झाली, बसायची वेळ झाली…
कसायची वेळ आली आता निजायची वेळ झाली …
मनगटावरले घडयाळ दरीत फेकून,
बेधुंद जगायला, खरेतर सवडच मिळत नाही…
हसण्याची वेळ… रुसण्याची वेळ… प्रेमात पडण्याची वेळ,
नाती तिळ-तिळ तुटण्याचीही असते एक वेळ…
तास, मिनिटे अन सेकंदाच्या मागे धावून,
कितीतरी दवडत चाललाय वेळ…
शिकण्याची वेळ… मोठा होण्याची वेळ … लग्नाची हि झालीय वेळ…
२ वर्ष झालीकी लग्नाला… आता पोर व्हायची आलीय वेळ…
वेळात वेळ काढून रात्री-अपरात्री पाळत आलोय मी वेळ,
दिवसभराच्या धकाधकीतून अजिबात मिळतच नाही ओ वेळ…
दिनक्रमाच्या वेळापत्रकातून जेव्हा मिळेल कधीतरी फावला वेळ,
कळेल खरेतर जीवन जगण्या नसतेच कुठली ठरावीक वेळ…
जाणीवेने या सैराट होवून जेव्हा मी नुसताच धावत सुटतो, कितीतरी वेळ,
लोक येतात आडवे म्हणतात, 'एक पोरीचा बाप झालास' आता पुरे झाला पोरखेळ…
~ अरुण भऊड
No comments:
Post a Comment