Sunday, January 31, 2016

असं कसं चालणार ?


असं कसं चालणार …

मी थोडी शायनिंग मारणार
तू लगेच माझ्यावर भाळणार
असं कसं चालणार ?…
तू लाईन दिली नाहीस म्हणून माझे मित्र माझ्यावर कसे हसणार ?

भर पावसात तू रेनकोट विसरणार
नेमका तुला मीच छ्त्रीसहित भेटणार
असं कसं चालणार ?…
कुण्या भलत्याच मुलाच्या छत्रीत तुला पाठमोरी चालताना पाहून माझे आभाळ कसे फाटणार ?

तू बस-स्टेन्ड वर उभी असणार
मी त्याच रस्त्याने बाईक वरून जात असणार
तू मैत्रिणींसमोर थोडा भाव खाणार
पण शेवटी मागच्या सीट वर हळूच येऊन बसणार
असं कसं चालणार ?…
मला तिथेच उभा ठेऊन तू मैत्रिणींसोबत बसमधल्या भर गर्दीत माझी खिल्ली कशी उडवणार ?

शेवटी मनातले भाव ओठांवर येणार
मी तुला आय लव्ह यू  म्हणणार
तू गालातल्या गालात हसणार
आणि आपण प्रेमात पडणार
असं कसं चालणार ?…
तुझ्या नकाराने उध्वस्त होऊन समुद्राच्या लाटेसोबत हुंदके देत तासान तास मी कसा बसणार ?

तुझ्या घरच्यांकडे मी तुझा हात मागणार
तुझे बाबाही लगेच संमत्ती देणार
आपले लग्न लागणार
आणि आपला संसार सुखाचा होणार
असं कसं चालणार ?…
तुझ्या विरहात झुरून कित्येक रात्री घालवल्याशिवाय मी प्रेमकवी कसा होणार ?

                                                                                                    ~ अरुण भऊड

No comments:

Post a Comment