Thursday, April 26, 2018

जात

जात...का नाही जात?
कशी करू तिच्यावर मात?

मळून घे या जातीची,
एक लांबलचक वात...
शिक्षणाच्या दीव्याने,
दिसुदे योग्य वाट...

होत नाही पहाट,
तोवर पेटू दे वात...
मग जळून होऊदे खाक,
एकदाची ती वात...

गेली जळून वात,
देऊन उजेडाची साथ...
आता नको नवी वात,
नाही उरला अंधार आत...

तुझ्या किरणांनी लाव वणवा,
पेटुदे घरोघरच्या वाती...
पोलिओच्या ही आधी संपुदे,
या अपंगत्वाच्या कृत्रिम साथी...

- अरुण भऊड

Tuesday, April 10, 2018

पुस्तकं प्रवास करतात...

पुस्तकं प्रवास करतात, एका सच्च्या खऱ्याखुऱ्या वाचकाच्या शोधात...
ज्यांचं घडवायचं असतं आयुष्य त्यांच्या कुठूनही दृष्टीस पडतात...
कधी ती क्रॉसवर्डच्या शेल्फ वरून त्याच्याशी थेट भिडतात...
कधी त्याच्या वाढदिवसाला मित्राची भेटवस्तू बनून येतात...

पैसे मोजून त्यांना विकत घेणारच नसतो नेहमी त्यांचा आयुष्यभराचा साथी...
म्हणूनच अनाहुत घरी आलेल्या पाहुण्याच्याही ती सहज लागतात हाती...
कधी ती बस अथवा रिक्षाच्या सीट वर निपचित पडत स्वतःला हरवून घेतात...
तर कधी जुन्या पेपरच्या रद्दीत लपून घरातून पळ काढतात...

खरा वाचकही रद्दीच्या गठ्ठ्यातून त्यांना नेमका शोधून काढतो...
झालेच एखादे  पुस्तक शहीद तर चण्याच्या पुडीवरूनही तो नव्या आवृत्तीचा माग काढतो...
पुस्तकंही कांदाभजीच्या उकळत्या तेलात बुडून मरता मरता आपलं नाव सांगत अमर होतात...
तो दोन पावलं त्यांच्या दिशेनं चालला...की पुस्तकं ही त्याच्या दिशेनं दोन पावलं चालतात...

सगळीच पुस्तकं काही आयुष्य घडवत नसतात...
पण जी घडवतात...
त्यांच्याच तर अावृत्यांवर आवृत्या निघतात!...
खरंच पुस्तकं सतत प्रवास करतात...
एखाद्याचं आयुष्य घडवायला झटतात...

- अरुण भऊड