जगायला काय लागतं?...
एक कॉफी...
सकाळी भर पावसात, खिडकीतून बाहेर पहात हातात एक कॉफी वाफळलेली...
केस मोकळे सोडून, ती कुशीत येऊन माझ्याकडे एक टक पहात बसलेली...
जगायला काय लागतं?...
एक पुरणपोळी...
ज्या दिवशी असतील थोडे अधिक पैसे, चपाती ऐवजी पुरणाची पोळी करू तुपात घोळलेली...
तोच खरा दिवाळसण माझा जेव्हा घरातल्या सगळ्यांची एकत्र पंगत असते बसलेली...
जगायला काय लागतं?...
एक कांदा भजी...
ताडपत्रीच्या आडोशाला, कढईत काळ्याकुट्ट तेलात कांदाभजी असते तळलेली...
ताव मारत तिच्यावर खिदळत असते एक मैत्री, डाएट ची बिलकुल पर्वा नसलेली...
जगायला काय लागतं?...
एक पापड...
डाळ भात संपवण्यासाठी पापड हातात घेत, मुलगी माझी नाचत राहते घरभर खुळी...
रात्रीच्या अंधारात चोरून जेवताना, पाहतो मी तिला पापड हातात ठेऊन तशीच निजलेली...
~ अरुण भऊड