Saturday, July 23, 2016

घर...

काहीतरी शोधायला म्हणून घराबाहेर पडतो...
सगळे मिळून शोधू म्हणत घरच्यांनाही सोबत घेतो...
उन्हापासून स्वतःला वाचवत कधी आडोसा शोधतो...
कधी खूपच दमछाक होते अन तिथेच विसावा घेतो...

जीवाची परवड होत असते तरी पुन्हा धाव घेतो...
पाठीवर संसार टाकून अक्षरशः रेटत मी नेतो...
कीर्ती मिळते, प्रसिद्धी मिळते, पैसाही मिळतो...
तरीही कशाचा तरी मी सतत शोध घेत राहतो...

आई बाप दमतात, त्यांना परत घरी सोडतो...
बायको पोरांसकट मी पुन्हा  नवी वाट धरतो...
मुलगा मधेच हात सोडून भलत्याच वाटेने जातो...
मुलीला सुरक्षित पाऊल वाटेने मग मीच पाठवतो...

आता फक्त मी आणि हि एकमेकांना उरतो...
तरीही सतत काशाचातरी मागोवा घेतच असतो...
संध्याकाळ होते सूर्य अस्ताला जाऊ पाहतो...
थकलेले आम्ही दोघे फिरुन जुन्या घराकडे वळतो...

कुठलेच कर्ज नसलेले जुने घर पुन्हा नव्याने पाहत राहतो...
त्याच्या डोक्यावर कर्जाचा कुठलाच हफ्ता उरलेला नसतो...
इतर फ्लॅट्समध्ये मात्र आजही पैसा गुंतवलेला असतो...
कित्येक फ्लॅट्सचा तर माझ्या पूर्ण पत्ताही आठवणीत नसतो...

जुने घर सुकलेल्या तोरणाने का होईना माझे स्वागतच करीत असतो...
इतकी वर्ष आलो नाही म्हणून त्याचा माझ्यावर मुळीच राग नसतो...
घरच्या नात्यांचा सहवास आता अधिकच हवाहवासा वाटू लागतो...
मित्रांसोबत रंगलेला पत्त्यांचा डाव चेहऱ्यावर पुन्हा हसू आणतो..

माझ्या हसण्या-खिदळण्याच्या जागा तो आजही जाणून असतो...
माझा लपून हुंदके देण्याचा कोपराही तो विसरलेला नसतो...
त्याचे आभार मानावे म्हणून मग शेवटलं सत्यनारायण घालतो...
ज्याच्यासाठी आयुष्यभर घर सोडले त्याचा शोध मला घरामधेच लागतो...

~ अरुण भऊड

No comments:

Post a Comment