Thursday, July 27, 2017

गतिमान...

सारं गतिमान झालंय हल्ली...
त्यामुळे तोल जातो माझा...
भरधाव वेगानं कुणीतरी समोरून जातं...
आणि मग बाचकायला होतं...

'विसावा' घेणं म्हणजे,
पळण्याच्या शर्यतीत विसावा आल्याचं भासतं...
मग मी देखील पळतो...
अगदी ऊर फुटेस्तोवर, धावत सुटतो...

विक डेज ला गावं शहराकडे पळतात...
आणि विकेन्ड ला शहरं गावांकडे...
मधे आहेत फक्त भरधाव वेगाने धावणारे रस्ते...
आणि त्यासाठी भरावे लागणारे टोल...

पडवीत आडवा होऊन, वाचायला घेतलेलं पुस्तक...
ते तसंच पडून आहे कधीचं...
फडफडताहेत ती केवळ वाचलेली पानं...
न वाचलेलं, चहाच्या कपाखाली तसंच बंदीस्त...

असा, उन्हा तानातून शहरं, गावं हिंडत बसतो...
घामाघूम होतो, तेव्हा वाटतं...
बिनझाडाच्या सावलीतही थांबावं थोडं...
घामाच्या थेंबांतूनही मग गारवा मिळतो...

पडवितलं पुस्तक उचलावं...
भरधाव रस्त्यातून एखादी पाऊलवाट काढत,
शहरं आणि गावांपासून दूर जावं...
विसाव्याचं एक झाड शोधावं...
अन चहाच्या कपाचा शिक्का शोधून,
उरलेलं निवांत वाचत पडावं...

~ अरुण भऊड

Wednesday, July 5, 2017

एक वर्ष onsite चं...

एक वर्ष onsite चं...

हल्ली मी social media वर तितकासा फिरकत नाही...मी काही व्यस्त नाही, पण इथे आल्यावर खूप वेगळं आयुष्य पाहायला मिळालं... व्हाट्सअँप आणि फेसबुक वर पोस्ट टाकण्यातच आपलं आयुष्य चाललंय असं वाटलं...

इथल्या लोकांचा दिनक्रम, त्यांचं कुटुंबासाठी साठी वेळ देणे, शरीरावर मेहनत घेणे, ८ ते ४:३० कामाची वेळ पाळणं आणि कामाच्या वेळी फक्त काम आणि बाकी गोष्टींकडे पाहायचे हि नाही... काळा-गोरा भेद नाही, मुलगा - मुलगी इतक्या सहजतेने बोलतात, अगदी अनोळखी असले तरी... मी किती लाजायचो लहानपणी...

कमी कपडे घालून एखादी मुलगी समोरून येत असली कि तिला पहायची उत्सुकता आपल्याकडे कशी निर्माण होत गेली हळूहळू अगदी शाळेतल्या वयापासूनच...आणि बलात्काराचे प्रकार आपल्याकडेच इतके का हे उमगलं... एखाद्या सुंदर कटिबद्ध विवस्त्र स्त्रीला हि एक सौंदर्य म्हणून पहायची शालीनता मी इथे आल्यावर शिकलो... आपण किती अंतर ठेवतो मुलगा आणि मुलगी म्हणून, का तर ते एकत्र आले कि त्याचा थेट अर्थ आपण शरीराशी लावतो... लग्न आणि मूल होणं हे आपल्या साठी mandatory mile stones आहेत आणि या दोन गोष्टीतच सारं सौख्य सामावलेलं आहे असा आपला समज आहे...

आई आणि बाप हे आता रिटायर्ड झालेत, नातवंडं त्यांच्या माडीवर खेळतायेत, मी आणि ती आम्ही दोघेही कामावतोय आणि त्यांना शेवटची तीर्थयात्रा करून आणले कि ते आनंदाने प्राण सोडायला मोकळे... मारताना ते म्हणतात हि, "चांगला सांभाळ केलास बाळा माझा..."

पण इथे आल्यावर यापालिकड चं आयुष्य कळलं... का त्यांनी एक स्वच्छंदी आयुष्य नव्याने जगू नये?...आम्ही ऑफिस ला गेल्यावर माझ्या मुलीचा सांभाळ करणं आणि onsite ला आल्यावर दर ४ महिन्याला पोस्टाने फराळ पाठवण्यासाठीच का उरलंय त्यांचं आयुष्य?...

म्हातारा बाप म्हणजे तो formal कपडेच घालणार आणि आई या वयात तू swimming क्लास ला कशी जाणार?... हि आपल्या विचारांची पोच...

नुसतंच जन्माला यायचं, शाळेत जायचं, मान मॉडेस्तोवर अभ्यास, मग नोकरी, मग लग्न आणि घर मग पोरं जन्माला घालायची, EMI भरायचा... एका तपानंतर कधीतरी जुन्या मित्रांना भेटायचं... मग शुगर होणार आणि मग बीपी... मग काढलेल्या पोरांवर ओझं व्हायचं आणि एक दिवस अंथरूण पकडून तिथेच शेवटचा प्राण सोडणार... किती scripted आहे हे सगळं...

इथे एक ५५ वर्षाचा तेज असणारा निग्रो तरुण angular developer म्हणून काम करतो काय आणि मग मधेच १ वर्षाचा ब्रेक घेऊन skiing शिकतो काय आणि पुन्हा तोच उत्साह घेऊन polymer developer म्हणून रुजू होतो काय...आणि मागच्याच आठवड्यात रुजू झालेल्या २२ वर्षाच्या fresher मुलीला date वर बोलावतो काय...

आपण मात्र रडतो, अरे तिकडे लोकांना सरकारी भत्ता मिळतो रिटायर्ड झाल्यावर... त्यांना saving चं टेन्शन नाही...

अरे मग तुम्हालाही कोणी सांगितलंय कणा तुटेपर्यंत काम करायला... दोन फ्लॅट आहेत ना तुझे 2BHK? तशीच वेळ आली तर त्यातला एक फुका... पण हात पाय चालताहेत तोवर सुटा!!!...

मुलांसाठी कामावतोय रे सारं, त्यांचं उच्च-शिक्षण, पोरीचं लग्न...

अरे कुणी सांगितलंय?... मुलांचा आधार बनताय कि त्यांच्या कुबड्या?... त्यांना फक्त लायक बनवा आणि त्याच्याघरी म्हातारपणी मी एका कोपऱ्यात पडून राहणार नाही याच्या तुम्ही लायक बना!!!...

अजून बरंच काही सांगून गेलं हे एक वर्ष onsite चं... जसं जमेल तसं सांगत जाईन पुढे...

नवीन technology तर आपण नेहमीच घेतो बाहेरच्यांकडून... थोडं आयुष्यही पहावं म्हटलं जरा खिडकीतनं वाकून...तसं आपल्या सारखं नाही ठेवत इथे झाकून... 😀

~ अरुण भऊड

Tuesday, July 4, 2017

क्षण...

ते क्षण...
इतके हळवे...
इतके नाजूक...
तरी आठवताच...
उठते छातीत एक कळ...

त्या समुद्र किनारी...
संथ प्रवाह...
निरव शांतता...
हातात कोमल हात...
तरी साद घालताच...
मनात उसळतात उंच लाटा...

त्या झाडाखाली...
तुझ्या डोळयांत...
प्रेमळ जिव्हाळा...
अन मायेची साऊली...
तरी मागे पाहताच...
धडकी भरत येते एक वादळ...

या जन्मी...
आजार नाही...
अपघात नाही...
कि नाही कुठलाच फास...
प्राण शोषिल कदाचित...
आठवणीतलाच, क्षण एखादा खास...

~ अरुण भऊड