Sunday, October 30, 2016

दिवाळसण...

पहाटेचा गजर,
मुलांचा डबा...
७:१८ ची लोकल,
ऑफिसची धावपळ...
Saturday ला outing ठरलेली,
संडेचं काय? मॉलमधे जाऊ चल...
झोपा आता लवकर,
उद्या पुन्हा ऑफिसला जायचंय...
तारेवरची कसरत,
सततची तारांबळ...
अशावेळी विसाव्याच्या,
घेऊन येतो एक क्षण...
माझा दिवाळसण।।

साफसफाई च्या निमित्ताने,
भेटते मग अडगळ...
जुन्या आठवणी ताज्या होतात,
दूर होते मरगळ...
शहारून येते अंग, लावता सुगंधी उटणं,
स्थिरावते मन, नाही नेहमीचे पळत सुटणं...
भिंतींना कोणता,
लावला होता रंग...
सांगत सुटतो एकच सण...
माझा दिवाळसण।।

LED च्या युगात,
तो बल्ब ची आठवण करतो...
तेल घालून डोळ्यात,
मग मी कापसाची वात मळतो...
जिथे चालत नाही क्रेडिट कार्ड,
असा लक्ष्मीपूजनाचा घाट घालतो...
कितीतरी दिवसांनी मी,
खऱ्याखुऱ्या नोटांना हात लावतो...
सारं निराळच पण...
माझा दिवाळसण।।

जुन्या contact लिस्टवर,
बोटे नकळत पडतात...
माझी पावले आपसूकच,
मित्रांच्या घराकडे वळतात...
भाऊबीजेच्या निमित्ताने,
सारे नातेवाईक भेटतात...
कळते, बायका मुलांशिवाय,
इतरहि कुणी आपले असतात...
आठवून जातो एक एक जण...
माझा दिवाळसण।।

फ्लॅटलाहि एक असते अंगण,
सांगून जातो माझा दिवाळसण...
शेजारीही आपल्या राहते कुणीतरी,
दार ठोठावून सांगतो माझा दिवाळसण...
श्रीमंतांचा बंगला अन गरिबाची झोपडी,
दोन्ही उजळून जातो माझा दिवाळसण...
दुःखातही तो हसायला भाग पाडतो,
माझ्या जगण्याचं वंगण...
माझा दिवाळसण।।

~ अरुण भऊड

Thursday, October 20, 2016

जगावेगळा...

तू गोरा... मी काळा-सावळा
तू सुटा-बुटात... मी गबाळा...
बाहेरून तू निराळा मी निराळा...
पण आतमध्ये माणूसच तळाला...

ट्रेन माझी हि miss होते, तुझी हि...
सर्दी मला हि होते, अन तुलाही...
BEER चढते मलाही, आणि तुलाही...
सुंदर मुलगी दिसताच, वळते मान माझीही अन तुझीही...

उच्चार नाहीत कळत तुझे मला, आणि माझे तुलाही...
अळणी जेवण तुझेही रुचत नाही मला आणि माझे तिखट तुलाही...
नवीन चप्पल टोचते माझ्या पायाला अन शूज तुझ्याही...
ओठावर हसू अन मनात मात्र सल तीच माझ्याही, अन तुझ्याही...

फॅमिली तुलाही अन कुटुंब मलाही...
मला मूल लग्नानंतर, तुला लग्नाआधी...
तुझ्या pram मधले बाळ माझ्याकडे पाहून हसते अन माझ्या कडेवरचे तुला पाहून...
चुकल्या चुकल्या सारखे वाटते सतत मलाही आणि तुलाही, फॅमिली पासून दूर राहून...

फिरंगी म्हणून तू कुणी नाहीस वेगळा...
आणि indian म्हणून मी जगावेगळा...
कदाचित तू पाण्यातला बगळा आणि मी फांदीवरला कावळा...
सरतेशेवटी तुझ्यातला gentleman आणि माझ्यातला 'माणूस' भावला एकमेकाला...

~ अरुण भऊड

Sunday, October 16, 2016

स्वयंपाक...

कित्येक वर्ष,
मी तो फक्त खाण्यातच घालवली...
बनत असेल कसा,
कधी विचारपुसच नाही केली...

निसर्गाच्या पोटातून...
थेट kitchen च्या ओट्यावर...
"आई वाढ गं" म्हणताच,
मी असे भरल्या ताटावर...

रडू आणणारे कांदे आणि
फोडणी नंतर चा ठसका...
स्वयंपाकाच्या नुसत्या नावाने...
आधीच घेतला धसका..

निसर्गाचा कोप झाला,
म्हणाला दाखवतोच तुला...
आई नाही, बायको नाही, धाडले परदेशाला...
किराणा दिला बॅगेत, म्हणाला लाग आता कामाला...

पहिले काही दिवस,
maggi वरती भागले...
पैसे संपू लागताच,
बाहेर खाणेही थांबले...

आता उरला नव्हता पर्याय,
kitchen मध्ये घुसण्याशिवाय...
गत्यंतरच नव्हते हाती चाकू-सुरी घेऊन,
दोन हात करण्याशिवाय...

Technology चा वापर करून,
केला पहिला फोन आईला...
भाजी चिरण्या साठी मग,
लावला हेडफोन कानाला...

कांदे चिरता चिरता,
माझे डोळे लागले झोंबायला...
भाजी चिरून झाली तरी,
ते तयार नव्हते थांबायला...

कढईत तेल टाकून,
ठेवले तिला उकळायला...
तळातले पाणी तसेच,
मग लागले तेल उडायला...

पाणी निघून जाण्यासाठी,
तेलाला अधिकच उकळले...
जिऱ्याचे दाणे टाकताच,
ते तेलात होरपळून करपले...

मोहरीची फोडणी कसली,
तो तर होता धुराचा लोट...
शेवटी कोथिंबीर चिरतानाहि,
मी कापून घेतले बोट...

एक dish बनताच
लगेच फोटो share केला...
फोटो पाहून कुणाला कळते,
मी इथे काय पराक्रम केला...

मी तेच तर केले जे आईने,
फोनवर सांगितले...
कळत नाही नेमके कुठे,
logic माझे गडबडले...

काही दिवस अर्धे कच्चे,
कधी करपट जेवण पचवले...
हळू हळू मग स्वयंपाकातले,
बारकावे मला समजले...

शाळा कॉलेजात जाऊन engineer झालो,
वाटले खूप काही कमावले...
स्वयंपाकघरातहि होते एक विद्यापीठ दडलेले,
का कधीच नाही उलघडले...

~ अरुण भऊड

Thursday, October 13, 2016

मोबाईल पत्र...

कितीतरी वर्षांनंतर...
पोस्टाने एक पत्र पाठवले तिला.
त्यात पाठवला...
माझा मोबाईल खिशातला.
ज्यात लिहिला होता...
मजकूर माझ्या मनातला.
जीवाला नुसता घोर लागून राहिला,
तिचा reply मिळायला... ??? 😊

Tuesday, October 11, 2016

मी मुक्त...

मी सक्षम... मी मुक्त!
मी सशक्त... मी मुक्त!

मी शिक्षित... मी मुक्त!
मी स्वच्छंदी... मी मुक्त!

मी खेळकर... मी मुक्त!
मी खोडकर... मी मुक्त!

मी मुलगी... मी मुक्त!
मी tomboy... मी मुक्त!

मी अभिमानी... मी मुक्त!
मी अभिलाषी... मी मुक्त!

मी सामाजिक... मी मुक्त!
मी व्यावहारिक... मी मुक्त!

मी कणखर... मी मुक्त!
मी जगभर... मी मुक्त!

मी ग्रामीण... मी मुक्त!
मी शहरी... मी मुक्त!

मी गोरी... मी मुक्त!
मी सावळी... मी मुक्त!

मी पारंपरिक... मी मुक्त!
मी sleevless... मी मुक्त!

मी bob cut... मी मुक्त!
मी boy cut... मी मुक्त!

मी भावूक... मी मुक्त!
मी नाजूक... मी मुक्त!

मी बाई... मी मुक्त!
मी आई... मी मुक्त!

मी आजी... मी मुक्त!
मी माझी... मी मुक्त!

तू समंजस... मी विमुक्त...
तू मूक... मी विभक्त...

~अरुण भऊड