मराठी शाळेत गुढीपाडव्याला पोरं ,
दरवर्षी म्हणायची...
'पाडवा बोल पाडवा'... "पाडवा",
'जा नाल्यात जाऊन हो आडवा'
नवीन वर्षाच्या दिवशी,
कसलं अभद्र बोलतोस गाढवा?...
मास्तरांच्या छडीने,
आधी याला कुणीतरी बडवा!
शाळा संपली,
आणि मराठीशी नाते तुटले...
आता मराठी शाळा देखील संपल्या,
अन इंग्रजीचे पेव फुटले
केवळ मराठी आहोत म्हणून,
उभारतो गुढी...
मनात मात्र एकमेकांच्या,
केवढी अढी!
अडीच लोकांचं कुटुंब पण,
३ बीएचके त्यांच्यासाठी...
गुढी उभारायला नसते साधी,
वेळूची काठी!
टॉवरच्या हव्यासापोटी,
सुटले आभाळ अन तुटले अंगण...
मिनीएचर गुढी आणतो घरी,
ज्यात नसते कसलेच आपलेपण!
कोलेस्टेरॉल वाढेल म्हणून,
नको बत्तासे च्या गाठी...
मॉल मध्ये गेल्यावर मात्र,
चीझ बर्गर च्याच पाठी!
पब मध्ये एन्जॉय करतात,
कडवट अफू ची गोळी...
शास्त्र म्हणून कडुनिंबाचा पाला,
यांच्या उतरत नाही गळी!
बाईक रॅलीत नऊवारीत मी,
इंस्टाग्राम सजवते...
घरातला पसारा मात्र माझी,
बाईच आवरते!
प्रत्यक्षात न भेटता आम्ही,
व्हाट्सअँपवर खूप सोशल असतो...
आयटी कंपन्यांत म्हणे हल्ली,
गुढीपाडवा देखील ऑपशनल असतो!
कर्माचे भोग म्हणून,
तुला हि नाट लागलीय गाढवा...
थर्टीफस्ट फेम नववर्षाला,
म्हणूनच असतोस ढोसून आडवा!
~ अरुण भऊड