गजानन संताजी सुळे उर्फ तात्या यांची हि वास्तू. सुळे घराणे मूळचे रोहे तालुक्यातील आतोणे गावचे पण त्यांच्या आजोबांना खरवली हे गाव आवडले व ते शेती घेऊन येथेच स्थायिक झाले.
तात्या शेती करत. कुटुंबाच्या निर्वाहापुरते उत्पन्न त्यातून होत असे. तात्या आसपासच्या गावातील लोकांना झाडपाल्याची औषधे देत असत. साप अथवा विंचू चावल्यास मंत्राने विष उतरवीत पण या कामाचे ते पैसे मात्र घेत नसत. मांत्रिक म्हणून ते काही कडक नियम पाळीत असत. त्यांच्या मंत्र सामर्थ्यात काही उणीव येऊ नये म्हणून ते अविवाहित राहिले. लोकसेवेसाठी केवढा हा प्रपंच त्याग!
कौटुंबिक जबाबदारीमुळे तात्यांना देशकार्यात सहभागी होता आले नाही, पण त्यांचे बंधू श्री. भास्कर संताजी सुळे उर्फ 'भाई' यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. "तू खुशाल देशकार्य कर, एक भाऊ देशाला दिला असे मी समजेन" अशा शब्दात तात्यांनी भाईंना देशकार्यात झोकून देण्यास प्रोत्साहन दिले.
भास्कर उर्फ भाईंनी वयाच्या तेवीस व्या वर्षीच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. देशासाठी कित्येक स्थित्यंतरे केली आणि तुरुंगवास देखील भोगला. भाईंची पत्नी विजया ही नर्स होती, तिने स्त्रियांच्या उन्नतीसाठी खरवलीत आरोग्य केंद्र स्थापून लोकसेवा केली. देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन सुरू झाली पण भाईंनी पेन्शन घेण्यास साफ नकार दिला. आपण केलेल्या कर्तव्याचे रुपये व पै मध्ये मूल्य होऊ नये अशी त्यांची धारणा होती.
अशा महान कुळाचे वास्तव्य असलेली ही जागा, श्री. वेटू मालू भऊड यांनी, त्यांची केवळ आठवण म्हणून विकत घेतली आहे. व्यवहार भौतिक वस्तूंचा होऊ शकतो पण तात्यांची व भाईंची शिकवण मात्र अमूल्य आहे.
या घरात वास्तव्य करणारी प्रत्येक व्यक्ती समता, विश्वबंधुत्व, सुहृदयता आणि निसर्गपूजेस बांधिल आहे.
No comments:
Post a Comment