Wednesday, November 16, 2016

मोहिनी...

इतकं प्रेम करतोस माझ्यावर,
असं काय पाहिलंस माझ्यात?

तुझे डोळे...
पहिल्यांदा जेव्हा तुझ्या डोळ्यांत पाहिलं ना,
तेव्हाच उमगलं...
Ray ban चे ग्लासेस वापरतेस तू...

तुझा कापसासारखा मऊ हात हातात घेतला ना,
तेव्हा समजलं...
Rado च्या घड्याळाची इतकी craze का आहे ते...

तुझे वाऱ्यासवे उडणारे केस जेव्हा तू कानामागे घेतेस ना,
किती छान दिसतेस...
अगदी तुझ्या कानातल्या De Beers च्या मोत्यांसारखी...

तुला कवेत घेताच,
मोहून टाकणारा armani चा सुगंध...
आणि तुझ्या गुलाबी ओठांच्या वर,
L'OREAL kohl ने काढलेला इवलासा तीळ...

तुझं सौंदर्य मलाच नाही, साऱ्या दुनियेला मोहिनी घालतात...
रुपड्याच्या ह्या बाजारात भावनांना हि आजकाल लेबलं लावतात...

~ अरुण भऊड

Monday, November 14, 2016

आकर्षण...

शाळेत काय माहित, हे शेंबडं पोरगं पुढं जाऊन डॉक्टर होईल...
कुणाला वाटलं होतं तो चड्डीची शिलाई असलेला उद्या इंजिनिअर होईल...
मी दोन्ही हात सोडून सायकल चालवणाऱ्या झिपऱ्यावर भाळले...
थोडे थांबायला पाहिजे होतं, हे जरा उशिरानेच कळून चुकले...

~ अरुण भऊड

Sunday, November 13, 2016

विषय...

तो थोडं काही झाले कि माझ्याकडे येतो...
कधी घरचा, कधी बाहेरचा मॅटर असतो...
चल एक एक बिअर घेऊ म्हणत बार मधे नेतो...
घरी जाताना नव्या कवितेचा विषय देऊन जातो...

~ अरुण भऊड

Saturday, November 12, 2016

असंच...

अहो, स्वतःकडे पहा जरा...
ते पोट पहा किती सुटलंय...
केसांचही काही खरं नाही...
उद्यापासून लवकर उठून, नियमित व्यायाम चालू करा...
योगी सारखा आहार घ्या अन रात्री वेळेवर झोपत चला...

मी म्हटले,
"अशी कोड्यात का बोलतेस? सरळ सांगना तुमच्यातल्या कवीचा खून करा म्हणून..."

२ मिनिटे मौन पाळल्यासारखी शांतता...

मनासारखं...

लहानपणापासून जे होतं उराशी बाळगलं...
आवंढा गिळुनही, कधी ओठी नाही आलं...
कधी धाकाने ठेचलं, कधी पैशाने चिरडलं...
खरंच मला कधी मनासारखं नाही होता आलं...

कधी कुणी नाकात माझ्या, समाजाचं वेसण घातलं...
लोक काय म्हणतील सांगत संस्कृतीनं खोलीत डांबलं...
का शेजारचं पोर गेलं म्हणून मलाही इंग्रजी शाळेत घातलं?...
मनातलं फुलपाखरू उडण्याआधीच त्याचं butter fly झालं...

इंजिनिअर नाहीतर डॉक्टर, सगळं आधीच फिक्स झालं...
याहून काही वेगळं केलं म्हणजे पोर अगदी कामातून गेलं...
चार पैसे कमावत नाहीतोवर इतर सांगतील मी तेच केलं...
आता खरी सुरुवात करू म्हटलं, अन त्याच क्षणी लग्न जमलं...

बायकोला सांगितलं, तर ती म्हणाली तिने हि आजवर हेच केलं...
त्याच वेळी, 'तू तुला हवं ते कर' असं एकमेकांना वचन दिलं...
माझ्या स्वप्नांचे पंख लावून मी तिला आकाशात उंचच उंच नेलं...
पण पाळण्यातल्या रडण्याचा आवाजाने सारं पुन्हा जमिनीवर आलं...

कामाच्या व्यापातून कळलेच नाही कधी माझं स्वप्न माझ्या मुलांचं झालं...
आरशात पाहिलं अन लक्षात आलं आता आपलं वय होत आलं...
तुझ्या मुलांचही तेच होईल का, जे आजवर तुझं झालय?...
आणि तुझं हि तेच होईल का, जे तुझ्या आई-बाबांचं झालंय?...

मुळीच नाही,
कारण घरातल्या साऱ्यांना  मी ह्या बंधनातून केव्हाचं मुक्त केलंय...
वयाचा विचार न करता,
प्रत्येकाला उराशी एक स्वप्न बाळगायला सांगितलंय...

~ अरुण भऊड

Sunday, November 6, 2016

Autumn Falls...

ऑफिसात जातानाही पाने गळतात...
परतून माघारी येतानाही पाने गळतात...
पिकून पिवळीजर्द झालेली काही,
झाडांवरच सळसळतात...
खाली पडून सुकली तरी,
पावलांखाली चित्कारतात...

केशरी- पिवळ्या रंगांनी टवटवीत रस्ता सजलेला...
फुलांनाही लाजवेल असा पानांचा सडा पडलेला...
सुकलेल्या वृक्षाच्या देहाभोवती,
एक सुरेख रांगोळी रचलेली...
जणू, स्वतःनेच स्वतःला वाहिलेली,
एक भावपर्ण श्रद्धांजली...

येणाऱ्या जाणाऱ्यांची छाप सोडून जाणारी पाने...
मोटार गाड्यांच्या मागे सुसाट धावत सुटणारी पाने...
लहानग्यांना खेळता-खेळता हळूच कवेत घेणारी पाने...
रोमँटिक जोडप्यांच्या प्रेमात अलगद बरसणारी पाने...

अंकुर फुटून निर्माण झालेल्या हिरव्यागार वृक्षावर,
पहाटेची मंजुळ गाणी पक्षी नेहमीच गातात...
नष्टहोण्या जमिनीवर कोसळूनहि जी मनाला भावतात,
त्यांना Autumn Falls ची पाने म्हणतात...

Saturday, November 5, 2016

नकोतिथे भावूक...

माझा मित्र तक्रार घेऊन आला...
म्हणाला, किती प्रयत्न करतोय भावनिक न होण्याचा,
हि दुनिया खूप अवघड आहे लेका...
पण तुझ्या कविता, मला पुन्हा भावूक करतात...

मला गम्मत वाटली,
खरंच लोक गल्लत करतात...

हे candle light च्या टेबलावर लॅपटॉपवर excel उघडून बसतात...
आणि ऑफिसात sympathetic कविता जाऊन बॉस ला ऐकवतात...

सकाळची कोवळी किरणं जेव्हा खिडकीतून आत येऊन अंगावर खेळतात...
त्यावेळी हे खून, मारामाऱ्या आणि पॉलिटिक्स ने भरलेला पेपर वाचत बसतात...

हेच जेव्हा रात्री, बायको शेजारी बिछान्यात जाऊन पडतात...
तेव्हा त्यांना सकाळी पडलेल्या सेन्सेक्स च्या चिंता सतावतात...

गुलजार च्या कविता का कुणी मठ्ठ चेहरा करून वाचतात?
युद्ध भूमीवर का कधी कुणी भावूक होऊन आसवे गाळतात?

Spiderman सारखी उंच भरारी घेऊन साऱ्या दुनियेचा भार उचलावा...
अन काम फत्ते होताच, त्याच्या सारखा... आपल्या प्रेयसीला एकांतात नेऊन kiss देखिल करावा...

माझ्या ठायी नकोतिथे भावनांचा अतिरेक नसावा..
लोक टिळा लावून जातील इतका मी 'दगड' ही नसावा...

~ अरुण भऊड

Thursday, November 3, 2016

संवेदना...

मी माझ्या कामात व्यस्त असतो...
आणि कुणीतरी दारावरची बेल वाजवतो...

कधी व्यक्ती अनोळखी असते, पण संवाद अंगवळणी पडलेत...
इतके, कि मी माझ्या व्यस्त कामातून डोकेही वर काढत नाही...

भिकारी, दारातूनच "सायब, वाईच भाकर मिलल काय?",
मी, "बाबा, घरी कुणीच नाही, पुढे जा"...
सेल्समन "सर, क्या में आपके 2 मिनट ले सकता हूं?",
मी, "नही, बाजुवाले के पास जाओ, उसके लेलो"...
पोलिओ डोस देणारी बाई,  "कुणी लहान मूल आहे का घरात?",
मी, "दिलाय, बाळाला आधीच डोस दिलाय"...
केबल वाला "साहेब, केबल कलेक्शन",
मी, "आज नाहीयेत पैसे, उद्या ये"...
इस्त्री वाला "साब कपडा",
"हा कितना हुआ भैया, खातें में लिख लेना और नया वाला कपडा रखा है टेबल पे गिन लेना"...
चहावाला "साब, चाय का गिलास",
"हा वो बाहर, चप्पल स्टँड पे रखा है ले जाना"...

माझ्या व्यस्त कामातून कधी वेळ मिळाला तर या सगळ्या लोकांच्या जागी उभं राहून बघायचंय मला...
कसं वाटतं...

~ अरुण भऊड

हम सोचते है कि, वो सोचते रेहते है हमारे बारेमे...
वो सोचतें है, क्या भला हम सोचते है उनकें बारेमे...

कितना गलत सोचतें है हम, एक दुसरें के बारेमे...
हम डुबें उनकी याद में, और वो है उसी फरियाद में...

~ अरुण भऊड