Sunday, July 20, 2025

मोबाईल

काय सांगू या मोबाईलच्या,
किती गेलोय आहारी...
त्याच्या शिवाय संपतच नाही,
माझ्या बाळाची न्याहारी.

गजर वाजताच अंथरुणातच मी,
गुडमॉर्निंगचे मेसेज पाहतो...
जयंती वा पुण्यतिथी असल्यास,
डिजिटल फुले वाहतो.

फिरायला कुठे जायचे? उघडा मोबाईल...
रस्ता चुकल्यावर? उघडा मोबाईल...
कविता सुचल्यावर? उघडा मोबाईल...
निवांत वेळेत? उघडा मोबाईल!

मुलाचा अभ्यास वा विजेचे बिल
बँकेची कामं वा दुपारचे meal...
मित्रांशी गप्पा की विनोदी रिल्स 
बोटांना सतत मोबाईलचा feel.

नातेवाईकांना भेटून ये म्हटलं तर,
आमची लगेच धरते पाठ...
व्हाट्सअप उघडून पहिलं तर,
फॅमिली ग्रुप सतराशे साठ!

रोज संध्याकाळी घरोघरी हे,
कसले मोबाईलचे चाळे...
व्हिडिओकॉलवर अमेरिकेतून
बोलत असतात पोरं-बाळे.

सगळेच अडकले जर मोबाईलमध्ये,
अंत्ययात्रेसाठी केवळ उरतील थोडे...
मोबाईलवर मात्र RIP च्या नावाने,
कोरड्या आसवांचे उडतील  शिंतोडे.

~ अरुण भऊड



No comments:

Post a Comment