Friday, November 9, 2018

आणि... काशिनाथ घाणेकर















आणि.... डॉ. काशिनाथ घाणेकर!

बऱ्याच दिवसांनी एक अप्रतिम मराठी सिनेमा पहिल्या समाधान लाभलं... हरिश्चंद्राची फॅक्टरी नंतरचा मराठीतला मला आवडलेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम जीवनपट.

प्रत्येक कलाकाराने खूप प्रामाणिकपणे काम केलंय, प्रसाद ओक ने तर अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं काम केलंय... एखाद्या सिनेमात प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवायला ज्याज्या गोष्टींची गरज लागते त्या सगळ्या गोष्टी या सिनेमात आहेत, कुठेच अनावश्यक गाणी नाहीत आणि जी आहेत ती त्या त्या प्रसंगाला अगदी साजेशी.

नक्कीच सबकुछ सुबोध भावे आहे, कारण हा सिनेमाच तर काशिनाथ वर बनवलाय! आणि सुबोध चित्रपटाच्या कुठल्याच फ्रेम मधून जाऊच नये इतका त्याचा काशिनाथ म्हणून वावर सहज आणि सुंदर आहे!

सुलोचना दीदी म्हणून सोनाली कुलकर्णी, वसंत कानेटकर म्हणून आनंद इंगळे, प्रभाकर पणशीकर म्हणजे प्रसाद ओक, काशिनाथ ची पहिली पत्नी म्हणून नंदिता धुरी, दुसरी पत्नी कांचन झालेली नवोदित वैदेही आणि भालजी झालेले मोहन जोशी या प्रत्येक पात्रांची केलेली निवड अगदी सार्थ. मला एकाच पात्राची निवड खटकली आणि ती म्हणजे सुमित राघवनने केलेले श्रीराम लागू... काशिनाथ घाणेकरांना संपवणा रा नट म्हणून एका जास्त ताकदवान नटा ची निवड करायला हवी होती, ज्यामुळे काशिनाथ आणखी जास्त ठळक झाला असता!

काशिनाथ घाणेकरांचा प्रतिस्पर्धी म्हणून तरुण श्रीराम लागूंच्या चेहऱ्यावरचा जो भाव आणि देहबोली अपेक्षित होती ती सुमितला तितकीशी नाही जमलीय, किंबहुना सुमितकडे मी डॉ. लागू म्हणून पाहूच शकत नाही, यात सुमितचा काहीच दोष नाही, त्याने त्याचं काम केलंय... YZ या मराठी  सिनेमातला काका झालेला सागर deshmukh हा श्रीराम लागूंच्या भूमिकेत चपखल बसला असता (पण सध्या तो महेश मांजरेकरांचा 'भाई... व्यक्ती की वल्ली' या सिनेमात पुलंचं काम करतोय म्हणून कदाचित त्याच्या तारखा मिळाल्या नसत्या! ) 

शेवटी सिनेमातली मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे गुरु ठाकूर आणि अभिजित देशपांडे यांनी लिहिलेले चित्रपटाचे संवाद... ते इतके प्रभाव टाकतात की, न जमलेली पात्रे, अधे-मधे जुना काळ उभा करण्यासाठी लावलेला सेट, हा सेटच आहे असा होणारा उलघडा  या त्रुटी संपूर्णपणे झाकोळल्या जातात!

विक्टर चा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' पाहायला जात असाल तर कृपया थांबा आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर पहा, कारण या वर्षीच्या दिवाळीत काशिनाथच तिकीटबारीवरचा विक्टर आहे! :)

~ अरुण भऊड

No comments:

Post a Comment