Wednesday, November 7, 2018

पाच दिवसांची दिवाळी...

माझी दिवाळी केवळ पाच दिवस...
तुझी ही दिवाळी फक्त पाच दिवस...
कुणाला पर्वाच नाही,
कसे जगतो आम्ही वर्षातले बाकीचे दिवस...

पाच दिवस झाडलोट, घराची लख्ख सफाई!
इतर दिवस तोच पसारा,
तीच नेहमीची ऑफिसला निघायची घाई!

पाच दिवस नुसते अंगण नव्हे ,
तर अख्खी कॉलनी उजळून काढू!
उरलेले दिवस, कुणाचे लक्ष नाही बघून,
रस्त्यात हळूच पानाची भक्कम पिंक टाकू...

पाच दिवस तेवढे, फटाक्याच्या धुराची आणि,
आवाजाची जाणीवपूर्वक उणीव!
बाकीचे दिवस ध्वनी, जल, वायू अन्
भू-प्रदूषणाची कुणालाच नाही जाणीव...

दिवाळीचे पाच दिवस नाश्त्याला,
लाडू, करंजी, चकली अन् चिवडा!
इतर दिवस, मॅकडोनाल्डस् चा बर्गर अथवा,
रस्त्यावरचा कळकट्ट तेलातला मेदुवडा...

पाच दिवस मूर्तींची देखील पूजा-अर्चना,
भावाला ओवाळणी, नातलगांना भेटवस्तू!
उरलेले दिवस, कुणाचा साधा फोन नाही,
खायला उठते नुसती ही फ्लॅट नावाची वास्तू...

सुख समृद्धी अन् समाधाना साठी
गरजच नाही कुठल्या साडेतीन मुहूर्ताची...
तब्येतीची काळजी, नात्यांची नाळ,
अन् निसर्गाचे भान हिच नित्याची दिवाळी!

~ अरुण भऊड

No comments:

Post a Comment