Saturday, July 20, 2019

आवर्तन (Rotation)

२० वर्ष झाली शाळेला,
सरले एक पर्व अन् त्याहूनही कैक वर्ष...
आयुष्याची आकडेमोड झाल्यावर,
शाळेतल्या मैत्रीची ओढ लागली आकर्ष...

निर्मळ, निरागस, कधी बालिश अशी,
शाळेच्या बकावरली ती कट्टी अन् बट्टी...
रहाटगाडे ओढताना वाटले,
संसारातहि मिळावी एखादी मधली सुट्टी...

योग जुळून आला,
घातली मित्रांनी साद बऱ्याच वर्षांनी...
शनिवार, २७ जुलै रोजी,
भेटायचा घाट घातलाय पठ्ठ्यांनी...

भेटू पुन्हा एकदा,
अनुभवू प्रत्येकात घडलेले अद्वितीय परिवर्तन...
रियुनियन च्या निमित्ताने,
पूर्ण होवू घातलंय एक शालेय जीवनाचं आवर्तन...

कुणी राहील अलिप्त,
कुणी बोलतच राहील घडाघडा...
जखम वाहू लागल्यागत,
कुणी नाही लगेच होणार मोकळं भडाभडा...

जरी केले कितीही देशाटन,
घेत उंच भराऱ्या जरी केले जगभर परिभ्रमण...
ही अावर्तने होतच राहुदेत,
ती देतील शाळेतल्या घट्ट मैत्रीचं सततचे स्मरण...

तुझी कहाणी ऐकून,
कदाचित माझ्यातही होईल  काही परिवर्तन...
तुमच्याकडून काही शिकलो,
तर सार्थकी लागेल हे, शालेय जीवनाचे आवर्तन...

~ अरुण भऊड

No comments:

Post a Comment