Tuesday, June 19, 2018

निसटता पाऊस...

पाऊसच तो...
पकडू म्हटलं तर निसटतो...

छत्री रेनकोटचं ओझं पाठीवर असेल,
तर लपून बसतो...
लेदरचे नवीन फॉर्मल शूज घातले,
की बरसतो...
पाऊसच तो,
पकडू म्हटलं तर निसटतो...

विकडेज ला ऑफिस ला जाताना,
नको म्हटलं तरी दर्शन देतो...
वीकेंड ला, कांदा भजी चा नैवद्य केला,
तरी नवसाला पावत नसतो...
पाऊसच तो,
पकडू म्हटलं तर निसटतो...

शेतात पीक लावून झाले,
की तुरळक सरी...
आणि आंब्याला मोहोर आल्यावर,
सरिंवर सरी...
पाऊसच तो,
पकडू म्हटलं तर निसटतो...

एखाद्या शांत, निवांत रोमँटिक क्षणी
बायको सोबत असताना खिडकीत ये म्हटलं,
तर म्हणतोस नको, तुम्हाला प्रायव्हसी हवी...
आणि, तिला मरीन ड्राईव्ह ला तुझी भेट घालून देतो
असं म्हटल्यावर,  दामिनी सवे असा बरसतोस,
की अर्ध्या वाटेतूनच आम्ही परततो कसेबसे घरी...
शेवटी पाऊसच तो,
किती पकडू म्हटलं तरी निसटतोच...

पण कसाही आलास तरी येत रहा असाच, न सांगता,
हल्ली कुणीच नसतं घरी...
मी आणि ही ऑफिसात, मुलं कसल्यातरी क्लासला,
दारावर असते नेहमीच कडी...
खिडक्या घट्ट मिटून घेतलेल्या, त्यांना आतून बेड्या,
साधी फट ही नाही तुझ्या स्वागतासाठी...
तू येऊन गेल्याचा साधा मागमूसही नसतो एकाक्षणी
पार्किंग लॉट मधून लिफ्ट...आणि सरळ घरी...
अखेर पाऊसच तू,
किती भेटू म्हटलं तरी न भेटताच जातोस...

~ अरुण भऊड

No comments:

Post a Comment